नागरिकांना भेटू न दिल्याचा आरोप; अभिजीत दिपके संतापले, पोलिसांशी खडाजंगी

'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दिपके आणि पोलीस अधिकाऱ्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये शाब्दिक चकमक झाल्याची घटना समोर आली आहे. आपल्या निवासस्थानी भेटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पोलिसांकडून उद्धट वागणूक दिली जात असल्याचा आरोप करत दिपके यांनी पोलिसांवर नाराजी व्यक्त केली. “मी कोणाला भेटायचं हे पोलीस ठरवणार नाहीत,” असे म्हणत त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला घराबाहेर जाण्यास सांगितले.

Abhijit Dipke

छत्रपती संभाजीनगर: 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दिपके पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी पोलीस अधिकारी आणि दिपके यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याची घटना समोर आली आहे. नागरिकांना भेटण्यावरून पोलिसांकडून हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत दिपके यांनी संबंधित अधिकाऱ्यावर संताप व्यक्त केला.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी त्यांना भेटण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मात्र, गुरुवारी (दि. 7) दिपके यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले. आपल्याला भेटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांशी पोलीस उद्धटपणे वागत असल्याचा दावा त्यांनी केला.

“मी कोणाला भेटायचं हे पोलीस ठरवणार नाहीत”

पोलीस अधिकाऱ्याशी बोलताना अभिजीत दिपके आक्रमक झाले.
“पोलिसांनी मला सांगायचे नाही की मी कोणाला भेटायचे. मी कोणाला भेटायचे आणि कोणाला नाही, हे मी ठरवणार,” असे त्यांनी सुनावले.

यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्याची ओळख विचारत, “तुम्ही कोणत्या विभागाचे आहात? कोणत्या पोलीस ठाण्याचे आहात? तुमचे पद काय आहे?” असे प्रश्न उपस्थित केले.

नागरिकांना भेटण्यासाठी पोलीस अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप करत दिपके यांनी अधिकाऱ्याला घराच्या परिसरातून बाहेर जाण्यास सांगितले.

एआय टूलच्या सादरीकरणावरूनही दिपकेंचा सरकारवर सवाल

दरम्यान, अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर आणखी एक मुद्दा उपस्थित केला आहे. दिल्लीतील भारत मंडपम येथे झालेल्या एआय टूलच्या सादरीकरणासाठी आपली वैयक्तिक माहिती परवानगीशिवाय वापरण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

“माझी वैयक्तिक माहिती उघड करण्याची परवानगी कोणी दिली?” असा सवाल त्यांनी केला. तसेच सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडल्याचा दावा करत, अमेरिकन कंपन्यांच्या माध्यमातून सरकार नागरिकांवर पाळत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

या सर्व आरोपांवर प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

Inline Article Ad 728x90