Pune : पुण्यात आबा बागुलांचा २१ वर्षांपासून अनोखा उपक्रम; रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या चिमुकल्यांना अभ्यंगस्नान, नवीन कपडे अन् फटाक्यांसह दिवाळी!
दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण! मात्र, समाजातील अनेक वंचित मुलांना आर्थिक परिस्थितीमुळे या सणाचा आनंद घेता येत नाही. अशाच मुलांच्या आयुष्यात दिवाळीचा आनंद फुलवण्यासाठी शिवसेनेचे नेते तथा माजी उपमहापौर आबा बागुल आणि आबा बागुल मित्र परिवाराच्या वतीने गेल्या २१ वर्षांपासून राबविण्यात येणारा अनोखा दिवाळी उपक्रम यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला.

पुणे : दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण! मात्र, समाजातील अनेक वंचित मुलांना आर्थिक परिस्थितीमुळे या सणाचा आनंद घेता येत नाही. अशाच मुलांच्या आयुष्यात दिवाळीचा आनंद फुलवण्यासाठी शिवसेनेचे नेते तथा माजी उपमहापौर आबा बागुल आणि आबा बागुल मित्र परिवाराच्या वतीने गेल्या २१ वर्षांपासून राबविण्यात येणारा अनोखा दिवाळी उपक्रम यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला.
पुण्यातील गुडलक चौकात रस्त्यावर झेंडे, फुले, फुगे आणि विविध वस्तू विकणाऱ्या लहान मुलांसाठी विशेष दिवाळी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या चिमुकल्यांना सुगंधी उटणे, मोती साबण आणि गरम पाण्याने पारंपरिक अभ्यंगस्नान घालण्यात आले. त्यानंतर नवीन कपडे भेट देऊन आणि त्यांच्यासोबत फटाके फोडून दिवाळीचा आनंद साजरा करण्यात आला. या अनोख्या उपक्रमामुळे मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.
पुण्यातील विविध चौकांमध्ये हातात फुगे, झेंडे आणि इतर वस्तू घेऊन विक्री करणारी अनेक मुले आपल्याला दररोज दिसतात. दिवसभर कष्ट करून उदरनिर्वाह करणाऱ्या या मुलांनाही इतर मुलांप्रमाणे सणांचा आनंद घेता यावा, त्यांनाही दिवाळीच्या अभ्यंगस्नानाचा आणि नवीन कपड्यांचा आनंद मिळावा, या भावनेतून आबा बागुल मित्र परिवाराने हा उपक्रम सुरू केला. गेल्या २१ वर्षांपासून कोणताही खंड न पडता हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे.
यावेळी बोलताना माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले, “गेल्या २१ वर्षांपासून आम्ही रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या आणि कुटुंबासोबत राहणाऱ्या लहान मुलांसोबत दिवाळी साजरी करत आहोत. आपल्या घरातील मुलांप्रमाणेच या मुलांनाही अभ्यंगस्नान घालून, नवीन कपडे देऊन आणि फटाके फोडून दिवाळीचा आनंद देता येतो, यापेक्षा मोठे समाधान दुसरे कोणतेही नाही.”
ते पुढे म्हणाले, “आज समाजातील अनेक वंचित मुलांकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण, आरोग्य आणि सण-उत्सवांचा आनंदही मिळत नाही. केवळ दिवाळी साजरी करून आपली जबाबदारी संपत नाही. या मुलांच्या भविष्याचा विचार करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. समाजातील सक्षम नागरिकांनी अशा मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची, आरोग्याची आणि इतर मूलभूत सुविधांची जबाबदारी स्वीकारावी. त्यांनाही सन्मानाने आणि आत्मविश्वासाने जीवन जगण्याची संधी मिळाली पाहिजे.”
दिवाळीच्या रोषणाईत समाजातील शेवटच्या घटकातील मुलांच्याही आयुष्यात आनंदाचा प्रकाश पोहोचावा, हाच या २१ वर्षांच्या उपक्रमामागील खरा उद्देश आहे.