घरातच लपलेलं भयानक सत्य... ४५ दिवसांनी उघड झालं!
आग्र्यातून समोर आलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. ४४ वर्षीय सुरेंद्र कुमार शर्मा गेल्या ४५ दिवसांपासून बेपत्ता होते, मात्र पोलिसांच्या तपासात त्यांच्या घराच्या बाथरुममध्ये फरशीखाली पुरलेला मृतदेह सापडल्याने हत्येचा भयानक प्रकार उघडकीस आला आहे.

सुरेंद्र कुमार शर्मा १८ मे पासून अचानक बेपत्ता झाले होते. त्यानंतर त्यांच्या पत्नी रुबीने कुटुंबीय आणि शेजाऱ्यांना ते घरातून निघून गेल्याचं सांगितलं होतं आणि ते लवकरच परत येतील, अशी दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप आहे. २६ मे रोजी सुरेंद्र बेपत्ता असल्याची तक्रारही पोलिसांत नोंदवण्यात आली होती. मात्र, तपास जसजसा पुढे सरकला तसतसे रुबीच्या जबाबात सातत्याने विसंगती आढळत गेल्या.
शुक्रवारी पोलीस एका जुन्या प्रकरणाच्या तपासासाठी पुन्हा त्यांच्या घरी पोहोचले असता, रुबीची वर्तणूक अत्यंत संशयास्पद वाटली. त्याचवेळी सुरेंद्र यांच्या भावाने दिलेल्या महत्त्वाच्या माहितीनंतर पोलिसांनी घराची सखोल झडती घेण्यास सुरुवात केली. संपूर्ण घरात केवळ बाथरुमचा भाग नव्याने दुरुस्त केलेला दिसल्याने पोलिसांचा संशय अधिकच बळावला. बाथरुममध्ये नव्याने बसवलेल्या फरशा, सिमेंटचं प्लास्टर आणि ताजं काम पाहून पोलिसांनी लगेचच मजूर बोलावले आणि फरशा तोडून खोदकाम सुरू केलं.
काही वेळातच फरशीखाली सुरेंद्र कुमार शर्मा यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला. हा प्रकार उघड होताच परिसरात एकच खळबळ उडाली. घराबाहेर बघ्यांची मोठी गर्दी जमली आणि संपूर्ण प्रकरणाचा थरार आणखी वाढला. पोलिसांनी तात्काळ आरोपी पत्नी रुबीला ताब्यात घेतलं असून, प्राथमिक चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिल्याचं समोर आलं आहे.
पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, हत्येनंतर मृतदेह बाथरुममध्ये पुरण्यात आला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी त्यावर माती टाकून सिमेंटचं प्लास्टर केलं गेलं. त्यानंतर वरून नवीन फरशा बसवून संपूर्ण घटना लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तपास पथकाने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून, फॉरेन्सिक टीमनेही सखोल पाहणी केली आहे.
दरम्यान, सुरेंद्र यांच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्र यांना दारूचे व्यसन होतं आणि पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणं होत असत. याच कौटुंबिक वादातून हत्या घडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, पोलीस सध्या केवळ या मुद्द्यावर थांबलेले नाहीत. या हत्येमागचं नेमकं कारण काय, खून एकट्याने करण्यात आला का, आणि यात आणखी कुणाचा सहभाग होता का, याचा कसून तपास सुरू आहे.
सुरेंद्र कुमार शर्मा यांचा मृतदेह पोस्टमॉर्टेम पाठवण्यात आला असून, पोस्टमॉर्टेम रिपोर्टनंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. सध्या या प्रकरणाने आग्रा शहरात मोठी खळबळ उडवली असून, पोलिसांच्या पुढील तपासाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.