अमित शाह पुणे दौऱ्यावर; काँग्रेसच्या आंदोलनाआधी पोलिसांची मोठी कारवाई

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी पुण्यात दाखल झाले आहेत. काँग्रेसच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक ताब्यात घेतले असून शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

अमित शाह Image

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी पुण्यात दाखल झाले आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पुणे पोलिसांनी शुक्रवारी रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे.

या कारवाईत युवक काँग्रेससह काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. काँग्रेस कार्यकर्ता राहुल शिरसाट यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले असून, येरवडा परिसरातील काही कार्यकर्त्यांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे. युवक काँग्रेसचे अक्षय जैन, गौरव बाळंदे, सद्दाम शेख आणि राजू ठोंबरे यांनाही प्रतिबंधात्मक ताब्यात घेण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

राहुल शिरसाट यांनी यापूर्वी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या दौऱ्यावेळी काळे झेंडे दाखवत आंदोलन केले होते. त्यामुळे यावेळीही अशा प्रकारच्या आंदोलनाची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी आधीच खबरदारी घेतली आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्तेही आंदोलनाच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप, दीप्ती चौधरी आणि माजी आमदार मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार आहे. उत्सव हॉटेल चौक परिसरात सकाळपासून काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे. दुसरीकडे, भाजपचे कार्यकर्तेही काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर जमल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, कटारिया महाविद्यालयात होणाऱ्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. कार्यक्रमस्थळी प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी केली जात असून डॉग स्कॉड, बॉम्ब शोधक पथक, सीसीटीव्ही देखरेख आणि मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. संपूर्ण परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यामुळे आज शहरातील राजकीय हालचालींना वेग आला असून आंदोलन, सुरक्षा व्यवस्था आणि राजकीय घडामोडींमुळे राज्याचे लक्ष पुण्याकडे लागले आहे.

Inline Article Ad 728x90