गणेशोत्सवाच्या गर्दीत अमित ठाकरेंच्या नजरेस पडलं हे दृश्य; व्हिडिओ शेअर करत मनसैनिकांना दिल्या थेट सूचना

गणेशोत्सवाच्या काळात अंगाला सिल्वर रंग लावून देव किंवा महापुरुषांच्या वेशात लहान मुलांकडून भीक मागून घेतली जात असल्याच्या प्रकारावर मनसे नेते अमित ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. असा प्रकार कुठेही दिसल्यास तो तातडीने थांबवण्याचे आवाहन त्यांनी महाराष्ट्र सैनिक आणि नागरिकांना केले आहे.

Amit Thackrey

मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात सर्वत्र उत्साह आणि आनंदाचे वातावरण असताना रस्त्यावर दिसलेल्या एका दृश्याने मनसे नेते अमित ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. अंगाला सिल्वर रंग लावून देव किंवा महापुरुषांच्या वेशात लहान मुलांना उभे केले जात असून त्यांच्याकडून भीक मागून घेतली जात असल्याचा मुद्दा त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. असा प्रकार कुठेही दिसल्यास तो तातडीने थांबवण्याचे आवाहन त्यांनी महाराष्ट्र सैनिकांसह नागरिकांना केले आहे.

अमित ठाकरे यांनी 21 सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये अंगाला सिल्वर रंग लावलेला एक लहान मुलगा महात्मा गांधी यांच्या वेशात दिसत असून तो पैसे मागत असल्याचे दिसते. या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी लहान मुलांच्या अशा वापराबाबत चिंता व्यक्त केली.

‘असं दिसलं तर तिथल्या तिथे थांबवा’

अमित ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये गणेशोत्सवाच्या आनंदाच्या वातावरणात रस्त्यावर वेगळेच वास्तव दिसत असल्याचे म्हटले आहे. लहान मुलांच्या अंगाला सिल्वर केमिकलचे रंग लावून त्यांना देव किंवा महापुरुषांच्या रूपात उभे केले जाते आणि त्यांच्याकडून भीक मागून घेतली जाते, असे त्यांनी नमूद केले.

अशा प्रकारांमध्ये लहान मुलांचे शोषण होऊ देऊ नका, असे आवाहन त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना केले. एखाद्या कुटुंबाला मदतीची गरज असल्यास शक्य ती मदत करण्याची तयारीही त्यांनी व्यक्त केली आहे.

मनसैनिकांना अमित ठाकरेंच्या सूचना

“आसपास असं काहीही दिसलं तर ते तिथल्या तिथे थांबवा,” असे आवाहन अमित ठाकरे यांनी केले आहे. पालक आणि नागरिकांनीही लहान मुलांना अशा प्रकारे वापरले जाणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी त्यांची भूमिका आहे. “हे चित्र आपल्याला बदलायचंच आहे,” असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

मुलांकडून भीक मागून घेण्याबाबत कायदा काय सांगतो?

लहान मुलांचा भीक मागण्यासाठी वापर करण्याबाबत कायद्यात स्वतंत्र तरतूद आहे. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 मधील कलम 76 नुसार एखाद्या मुलाला भीक मागण्यासाठी वापरणे किंवा त्याच्याकडून भीक मागून घेणे हा दंडनीय अपराध आहे. अशा प्रकरणात पाच वर्षांपर्यंत कारावास आणि एक लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.

याशिवाय बालक आणि किशोर कामगार कायद्यानुसार 14 वर्षांखालील मुलांच्या रोजगारावर व्यापक निर्बंध आहेत आणि कायद्यात काही मर्यादित अपवाद नमूद करण्यात आले आहेत. त्यामुळे गर्दीची ठिकाणे, रेल्वे स्थानके, जत्रा किंवा उत्सवांमध्ये लहान मुलांचा आर्थिक फायद्यासाठी वापर होत असल्याचे आढळल्यास संबंधित यंत्रणांकडून परिस्थितीनुसार कारवाई केली जाऊ शकते.

अमित ठाकरे यांच्या या आवाहनानंतर गणेशोत्सव आणि इतर गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारे मुलांचा वापर करण्याच्या घटनांकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे.

Inline Article Ad 728x90