रात्री जेवून झोपला, सकाळी खोलीत दिसलं धक्कादायक दृश्य; २२ वर्षीय शिकाऊ डॉक्टरच्या मृत्यूचं गूढ वाढलं
अमरावतीमध्ये नुकतीच BAMS पदवी पूर्ण केलेल्या २२ वर्षीय आदित्य रावटे या शिकाऊ डॉक्टरचा झोपेत संशयास्पद मृत्यू झाला. तो स्वतःच काही औषधे घेत असल्याची माहिती असून औषधांचा ओव्हरडोस, फिट्सचा झटका की अन्य कारणामुळे मृत्यू झाला, याचा उलगडा व्हिसेरा आणि अंतिम शवविच्छेदन अहवालानंतर होणार आहे.

अमरावती : अमरावती जिल्ह्यातून एका २२ वर्षीय शिकाऊ डॉक्टरच्या संशयास्पद मृत्यूची धक्कादायक घटना समोर आली आहे. नुकतीच BAMSची पदवी पूर्ण केलेल्या आदित्य रावटे याचा रात्री झोपल्यानंतर मृत्यू झाला. सकाळी कुटुंबीयांनी खोलीचा दरवाजा उघडल्यानंतर समोर आलेलं दृश्य पाहून त्यांना मोठा धक्का बसला.
आदित्य खोलीमध्ये पालथा पडलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्या दोन्ही डोळ्यांतून रक्त येत असल्याचेही कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच वलगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नुकतीच पूर्ण केली होती BAMSची पदवी
आदित्य रावटे याने नाशिकमधून नुकतीच BAMSची पदवी प्राप्त केली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो अमरावतीतील एका रुग्णालयात शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करत असल्याची माहिती आहे.
आदित्यला लहानपणापासून फिट्सचा त्रास असल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले आहे. याशिवाय, स्वतःचा रंग गोरा करण्यासाठी तो स्वतःच काही औषधे घेत असल्याची माहितीही समोर आली आहे.
औषधांचा ओव्हरडोस झाला होता का?
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य स्वतःवरच उपचार करत काही औषधांचे सेवन करत होता. त्यामुळे औषधांचा ओव्हरडोस झाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. औषधांचा ओव्हरडोस झाला होता की झोपेत फिट्सचा झटका आला होता, या दोन्ही शक्यतांचा तपास केला जात आहे.
रात्री जेवला अन् झोपला; सकाळी उठलाच नाही
घटनेच्या आदल्या रात्री आदित्यने नेहमीप्रमाणे जेवण केले आणि त्यानंतर तो आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेला. मात्र, दुसऱ्या दिवशी बराच वेळ झाल्यानंतरही तो खोलीबाहेर आला नाही.
कुटुंबीयांनी खोलीचा दरवाजा उघडून पाहिला असता आदित्य पालथा पडलेला होता. त्याच्या डोळ्यांतून रक्त येत असल्याचे दिसून आल्याने त्याला तातडीने तपासण्यात आले; मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात काय?
प्राथमिक शवविच्छेदन निरीक्षणानुसार, आदित्यचा मृत्यू श्वासरोध आणि हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला असण्याची शक्यता डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
मात्र, मृत्यूमागील निश्चित कारण अद्याप समोर आलेले नाही. व्हिसेरा तपासणी आणि अंतिम शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच आदित्यचा मृत्यू औषधांच्या परिणामामुळे झाला, फिट्समुळे झाला की अन्य कारण होते, हे स्पष्ट होणार आहे.
वलगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.