महाराष्ट्रात बनावट 'ॲनालॉग पनीर'वर वर्षभर बंदी; FDA ची मोठी कारवाई, नियम तोडणाऱ्यांना कठोर दंड

महाराष्ट्रात ग्राहकांची फसवणूक आणि भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात ॲनालॉग (नॉन-डेअरी) पनीरच्या उत्पादन, विक्री, साठवणूक आणि वापरावर एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

Analogue paneer

Ai Generated

मुंबई : महाराष्ट्रातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर ॲनालॉग (नॉन-डेअरी) पनीरच्या उत्पादन, विक्री, साठवणूक आणि वापरावर एक वर्षासाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा आदेश अधिकृत राजपत्रात प्रकाशित करण्यात आला आहे.

हा निर्णय अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 मधील तरतुदीनुसार लागू करण्यात आला आहे. नियमांनुसार 'पनीर' या नावाने विकल्या जाणाऱ्या उत्पादनामध्ये दुधातील स्निग्धांश (Milk Fat) असणे आवश्यक आहे. मात्र, दुधाऐवजी वनस्पती तेल, वनस्पती स्निग्धांश किंवा इतर दुग्धेतर घटक वापरून तयार केलेले उत्पादन 'ॲनालॉग पनीर' मानले जाते. अशा उत्पादनाला 'पनीर' म्हणून विकणे हा कायद्याचा भंग मानला जाईल.

हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सवरही बंदी

या निर्णयाचा परिणाम राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, भोजनालये, क्लाऊड किचन आणि केटरिंग व्यवसायावरही होणार आहे.

FDA च्या आदेशानुसार ॲनालॉग पनीरचा वापर, साठवणूक, विक्री किंवा ग्राहकांना ते अन्नामध्ये देण्यास पूर्णपणे बंदी आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित उत्पादन जप्त करून नष्ट करण्यात येईल. तसेच संबंधित व्यावसायिकांवर कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल.

सामान्य पनीरवर कोणतीही बंदी नाही

FDA ने स्पष्ट केले आहे की, हा निर्णय फक्त ॲनालॉग (नॉन-डेअरी) पनीरसाठी आहे. निर्धारित गुणवत्ता निकष पूर्ण करणारे नियमित पनीर बाजारात पूर्वीप्रमाणे उपलब्ध राहणार आहे.

  • फुल-फॅट पनीर खुले किंवा पॅकबंद स्वरूपात विक्रीसाठी उपलब्ध राहील.
  • मीडियम आणि लो-फॅट पनीर फक्त सीलबंद पॅकेजमध्ये आणि आवश्यक लेबलसह विकावे लागेल.

ॲनालॉग पनीर म्हणजे काय?

ॲनालॉग किंवा नॉन-डेअरी पनीर हे दिसायला अगदी अस्सल पनीरसारखे असते. मात्र ते दुधाऐवजी वनस्पती तेल, वनस्पती स्निग्धांश आणि इतर दुग्धेतर घटक वापरून तयार केले जाते. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता असते.


ॲनालॉग पनीर कसे ओळखाल?

  • पॅकेटवरील लेबलवर 'Analog Paneer', 'Analog Cheese' किंवा 'Non-Dairy Product' असे लिहिलेले असू शकते.
  • घटकांच्या (Ingredients) यादीत Vegetable Fat, Vegetable Oil किंवा Hydrogenated Oil असा उल्लेख असल्यास ते ॲनालॉग पनीर असू शकते.
  • असे पनीर सामान्य पनीरपेक्षा अधिक तेलकट किंवा रबरासारखे वाटू शकते.

FDA ने नागरिकांना पनीर खरेदी करताना लेबल आणि घटकांची माहिती काळजीपूर्वक तपासण्याचे आवाहन केले आहे. ग्राहकांची दिशाभूल रोखण्यासाठी आणि सुरक्षित अन्न उपलब्ध करून देण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Inline Article Ad 728x90