42 वर्षांचा विक्रम अखेर मोडला! विथ्या रामराजची ऐतिहासिक कामगिरी; गुलवीर सिंगनेही जिंकले रौप्यपदक

आशियाई खेळ 2026 मध्ये भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. विथ्या रामराजने महिलांच्या 400 मीटर अडथळा शर्यतीत कांस्यपदक जिंकत पीटी उषा यांचा 42 वर्षांपूर्वीचा राष्ट्रीय विक्रम मोडला. तर गुलवीर सिंगने पुरुषांच्या 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावत या स्पर्धेतील आपले दुसरे पदक जिंकले.

Vithya-Ramraj-Gulveer-Singh

जपान : जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई खेळ 2026 मध्ये सोमवारी (28 सप्टेंबर) भारतीय खेळाडूंनी अ‍ॅथलेटिक्समध्ये आणखी दोन पदकांची कमाई केली. भारताच्या विथ्या रामराजने महिलांच्या 400 मीटर अडथळा शर्यतीत कांस्यपदक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. तिने दिग्गज धावपटू पीटी उषा यांचा 42 वर्षांपूर्वीचा राष्ट्रीय विक्रम मोडला. दुसरीकडे, गुलवीर सिंगने पुरुषांच्या 1500 मीटर शर्यतीत वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवत रौप्यपदक पटकावले.


विथ्या रामराजची ऐतिहासिक कामगिरी; पीटी उषांचा विक्रम मोडला

महिलांच्या 400 मीटर अडथळा शर्यतीत विथ्या रामराजने अवघ्या 54.75 सेकंदांत अंतिम रेषा पार करत कांस्यपदकावर आपले नाव कोरले. यासोबतच तिने 1984 च्या लॉस एंजिल्स ऑलिंपिकमध्ये पीटी उषा यांनी नोंदवलेला 55.42 सेकंदांचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला.

विशेष म्हणजे, विथ्याने 2023 च्या आशियाई खेळांमध्ये पीटी उषा यांच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. आता तीन वर्षांनंतर तिने जुन्या विक्रमात 0.67 सेकंदांची सुधारणा करत नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे.


या शर्यतीत संयुक्त अरब अमिरातीच्या मरियम करीमने 54.31 सेकंदांची वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. कझाकस्तानच्या एडेलिना झेम्सने 54.58 सेकंदांत शर्यत पूर्ण करत रौप्यपदक मिळवले. विथ्याचे यंदाच्या आशियाई खेळांमधील हे दुसरे पदक असून यापूर्वी तिने मिश्र 4x400 मीटर रिले स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते.


गुलवीर सिंगची चमकदार कामगिरी; 1500 मीटरमध्ये रौप्यपदक

पुरुषांच्या 1500 मीटर धावण्याच्या अंतिम शर्यतीत गुलवीर सिंगने 3 मिनिटे 36.72 सेकंदांची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवत रौप्यपदक पटकावले. जपानच्या कझुतो इइझावाने 3 मिनिटे 36.35 सेकंदांत शर्यत पूर्ण करत सुवर्णपदक मिळवले, तर त्याच देशाच्या नागिया मोरीने 3 मिनिटे 37.92 सेकंदांच्या वेळेसह कांस्यपदक पटकावले.

गुलवीरचे यंदाच्या आशियाई खेळांमधील हे दुसरे रौप्यपदक आहे. यापूर्वी त्याने पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीतही रौप्यपदक जिंकले होते.


भारताची पदकसंख्या 41 वर; गुणतालिकेत 12वे स्थान

सोमवारी गुलवीर सिंग आणि विथ्या रामराज यांनी मिळवलेल्या पदकांमुळे भारताची एकूण पदकसंख्या 41 वर पोहोचली. भारताच्या खात्यात आता 4 सुवर्ण, 18 रौप्य आणि 19 कांस्यपदके जमा झाली असून भारत गुणतालिकेत 12व्या स्थानावर आहे.

Inline Article Ad 728x90