आसाम हादरला! १६ वर्षीय मुलीवर अत्याचारानंतर निर्घृण हत्या; तिघांना अटक

आसामच्या हैलाकांडी जिल्ह्यात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर कथित बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणात पोलिसांनी १७ ते १९ वर्षे वयोगटातील तीन आरोपींना अटक केली आहे. तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले असून, आरोपींवर BNS आणि POCSO कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपींना कठोर शिक्षेची मागणी होत आहे.

१६ वर्षीय मुलीवर अत्याचार Image

हैलाकांडी (आसाम) : आसाममधील हैलाकांडी जिल्ह्यात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर कथित बलात्कार करून तिची अत्यंत निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी १७ ते १९ वर्षे वयोगटातील तीन आरोपींना अटक केली असून, घटनेचा सखोल तपास करण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक (गुन्हे) यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे. प्राथमिक तपास आणि शवविच्छेदन अहवालात पीडितेवर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास कातलीछेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आलोईचोरा परिसरात घडली. घटनेच्या वेळी पीडितेचे कुटुंबीय जवळच असलेल्या नातेवाईकांच्या घरी मेजवानीसाठी गेले होते. कौटुंबिक वादानंतर पीडिता रात्री सुमारे साडेदहा वाजता एकटीच घरी परतली होती. त्यानंतर कुटुंबीय घरी पोहोचले असता तिचा मृतदेह घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला.

पीडितेच्या आईने आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली असून, "एका निष्पाप मुलीवर इतक्या क्रूरपणे अत्याचार करणाऱ्यांना कोणतीही दया दाखवू नये," अशी भावना व्यक्त केली. पीडितेच्या बहिणीनेही अत्याचारानंतर शरीर विद्रूप करण्यात आल्याचा आरोप केला आहे. पोलिसांच्या तपासातही मृतदेहावर गंभीर जखमा आढळून आल्या असून, पीडितेवर विविध वस्तूंनी अत्याचार करण्यात आल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

घटनेनंतर पोलिसांनी सुरुवातीला पाच संशयितांना ताब्यात घेतले होते. तपासादरम्यान त्यापैकी १७, १८ आणि १९ वर्षीय तिघांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाचे वय साडेसतरा वर्षे असून, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता त्याच्यावर प्रौढ आरोपीप्रमाणे खटला चालवण्याची विनंती न्यायालयाकडे करण्यात आल्याची माहिती हैलाकांडीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अमिताभ सिन्हा यांनी दिली.

प्राथमिक तपासात पीडिता आणि आरोपींपैकी एका तरुणामध्ये पूर्वीपासून ओळख तसेच कथित संबंध असल्याचे समोर आले आहे. मात्र, हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनास्थळावर जिल्हा आणि प्रादेशिक फॉरेन्सिक पथकांनी पाहणी करून महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत. शवविच्छेदनाचे चित्रीकरणही करण्यात आले असून, त्यामध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६५(१) (१६ वर्षांखालील मुलीवरील बलात्कार), कलम १०३(१) (हत्या) तसेच पॉक्सो (POCSO) कायद्याच्या कलम ६ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तिन्ही आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, तपासादरम्यान आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

या भीषण घटनेनंतर हैलाकांडीसह संपूर्ण बराक व्हॅली परिसरात संतापाची लाट उसळली आहे. स्थानिक नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर रास्ता रोको आंदोलन करत आरोपींना कठोरात कठोर शिक्षा आणि फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांनी नागरिक आणि सोशल मीडियावरील वापरकर्त्यांना पीडितेची ओळख अथवा तपासाशी संबंधित संवेदनशील माहिती सार्वजनिक न करण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, सर्व संबंधित पुराव्यांची बारकाईने छाननी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Inline Article Ad 728x90