मंत्री अतुल सावे यांच्या भावाला आणि पुतण्याला मारहाण; शेतीच्या वादातून नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये शेती आणि रस्त्याच्या वादातून राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या मोठ्या भावासह पुतण्याला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. दोघांनाही उपचारासाठी बिडकीन ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांकडून घटनेची माहिती आणि जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर : शेतीच्या बांधावरून किंवा जमिनीच्या हद्दीवरून सुरू झालेला वाद अनेकदा गंभीर स्वरूप धारण करतो. मात्र, याच प्रकारच्या वादातून आता राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या कुटुंबातील दोघांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.
पैठण तालुक्यातील नायगाव खंडेवाडी, बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. शेती आणि रस्त्याच्या वादातून एका गटाने अतुल सावे यांच्या मोठ्या भावासह पुतण्याला मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेत अजित मोरेश्वर सावे (वय ७०) आणि अमेय अजित सावे (वय ३५) हे दोघे जखमी झाले आहेत. दोघांनाही उपचारासाठी बिडकीन ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींची विचारपूस करून त्यांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान, शेती आणि रस्त्याचा हा वाद नेमका कशामुळे सुरू झाला आणि मारहाणीमागील नेमकं कारण काय? याचा तपशील पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
अतुल सावे हे राज्य सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते असल्याने त्यांच्या भावाला आणि पुतण्याला झालेल्या मारहाणीच्या घटनेकडे राजकीयदृष्ट्याही पाहिले जात आहे. मात्र, या घटनेमागील नेमकी पार्श्वभूमी आणि जबाबदार व्यक्तींबाबत अधिकृत तपशील पोलिस तपासानंतरच स्पष्ट होईल.