BHMS डॉक्टरांच्या MMC नोंदणीला ब्रेक! न्यायालयाच्या निर्णयापर्यंत सरकारचा मोठा निर्णय

IMA आणि सेंट्रल MARDच्या विरोधानंतर BHMS डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमधील नोंदणी न्यायालयाच्या अंतिम निर्णयापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

homoeopathy

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील BHMS डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) नोंदणीचा वाद आता आणखी रंगला आहे. 3 ऑगस्टच्या शासन निर्णयानंतर नोंदणीच्या मागणीसाठी BHMS डॉक्टरांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला होता. मात्र, या निर्णयाला IMA आणि सेंट्रल MARDकडून तीव्र विरोध करण्यात आला. त्यानंतर सरकारने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप केला आहे.


वैद्यकीय शिक्षण विभागाने BHMS डॉक्टरांची MMCमधील नोंदणी मुंबई उच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय होईपर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 3 ऑगस्टच्या शासन निर्णयानुसार नोंदणी होण्याची अपेक्षा असलेल्या BHMS डॉक्टरांना सध्या प्रतीक्षा करावी लागणार आहे.

या निर्णयामागे सध्याचे वैद्यकीय क्षेत्रातील वातावरण आणि नोंदणीची योग्य कार्यपद्धती निश्चित करण्याची गरज असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. BHMS डॉक्टरांना MMCमध्ये समाविष्ट करण्याच्या मुद्द्यावरून अ‍ॅलोपॅथी आणि होमिओपॅथी डॉक्टरांच्या संघटनांमध्ये मतभेद तीव्र झाले होते.


यापूर्वीच्या आंदोलनामुळे आरोग्यसेवेवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने दोन्ही बाजूंची भूमिका विचारात घेत मध्यस्थीचा मार्ग स्वीकारला. मात्र, आता हा संपूर्ण वाद न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून राहणार आहे.

दरम्यान, सरकारच्या या निर्णयानंतर BHMS डॉक्टरांची पुढील भूमिका काय असेल आणि उच्च न्यायालय या प्रकरणात कोणता निर्णय देणार, याकडे वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Inline Article Ad 728x90