जमुई छेडछाड प्रकरणात मोठी कारवाई! भगव्या गमछाने चेहरा झाकणाऱ्या मुख्य आरोपीच्या पायात गोळी; आणखी एक आरोपी जखमी

बिहारमधील जमुई येथे अल्पवयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये भगव्या गमछाने चेहरा झाकलेला मुख्य आरोपी नंदन यादव पोलिसांच्या चकमकीत जखमी झाला आहे. त्याच्या पायात गोळी लागली असून, दुसरा आरोपी हरेराम यादवही जखमी झाला आहे. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Bihar Crime

बिहार : बिहारमधील जमुई जिल्ह्यात १९ सप्टेंबर रोजी एका अल्पवयीन मुलीची छेडछाड आणि तिच्यासोबत असलेल्या मुलाला मारहाण केल्याच्या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला होता. मंगळवारी, २२ सप्टेंबर रोजी मुख्य आरोपी नंदन यादव याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांशी चकमक झाली. या चकमकीत त्याच्या पायात गोळी लागली असून, त्याला अटक करण्यात आली.

मडवा डोंगरात लपलेला आरोपी; पोलिसांच्या कारवाईत नेमकं काय घडलं?

पोलिसांच्या माहितीनुसार, मुख्य आरोपी नंदन यादव आणि त्याचा साथीदार एका डोंगराळ परिसरात लपून बसले होते. पोलिसांच्या पथकाने त्यांचा शोध घेऊन त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून गोळीबार झाल्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. त्यावेळी पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या नंदन यादवच्या पायात गोळी लागली. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दुसऱ्या आरोपीचाही पाय जखमी

या कारवाईत हरेराम यादव नावाच्या आणखी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या पायालाही दुखापत झाली असून, त्याला जमुई सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचा पाय मोडल्याचे वृत्त समोर आले असले, तरी त्याला गोळी लागली आहे की नाही, याबाबत स्पष्टता झालेली नाही.

व्हायरल व्हिडिओमुळे संपूर्ण प्रकरण उघडकीस

१९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा ते सातच्या सुमारास ही घटना घडली होती. दुचाकीवरून जाणाऱ्या अल्पवयीन मुलगा आणि मुलीला काही तरुणांनी रस्त्यात अडवले होते. त्यानंतर मुलाला मारहाण करण्यात आली, तर मुलीची छेडछाड करण्यात आल्याचा आरोप आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये भगव्या गमछाने चेहरा झाकलेला एक व्यक्ती मुलीला उचलून नेताना दिसत आहे. या व्यक्तीची ओळख नंदन यादव अशी पटल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून यापूर्वीच तीन जणांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाचीही स्थापना करण्यात आली आहे.

तेजस्वी यादव यांच्याकडून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

या घटनेनंतर बिहारमधील राजकीय वातावरणही तापले आहे. विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी राज्यातील महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यावर टीका केली आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी केलेल्या वक्तव्याची आठवण करून देत यादव यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Inline Article Ad 728x90