सण-उत्सवातील DJ च्या दणदणाटाची थेट हायकोर्टाने घेतली दखल; नियम मोडल्यास पुढे काय होणार? दिले कडक आदेश

महाराष्ट्रात सण-उत्सवांदरम्यान होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा आता मुंबई हायकोर्टात पोहोचला आहे. न्यायालयाने या प्रकरणाची सुमोटो दखल घेत राज्य सरकारकडून ध्वनीप्रदूषणाच्या नियमांची अंमलबजावणी आणि त्यासंदर्भातील अहवाल मागवला आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास साऊंड सिस्टीम जप्त करून गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

High_Court

मुंबई : राज्यात सण आणि उत्सवांच्या काळात होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. पुण्यात विद्यानंद बापट यांनीही ध्वनीप्रदूषण आणि मिरवणुकांमुळे होणाऱ्या वाहतूक अडथळ्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर आता मुंबई हायकोर्टाने सण-उत्सवांमध्ये डीजे आणि मोठ्या क्षमतेच्या साऊंड सिस्टीममुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाची सुमोटो दखल घेतली आहे.

न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर हा मुद्दा आला. न्यायालयाने राज्य सरकारला ध्वनीप्रदूषणासंदर्भातील नियम आणि त्यांची प्रत्यक्षात कशी अंमलबजावणी केली जाते, याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

नियम मोडल्यास साऊंड सिस्टीम जप्त?

सण आणि धार्मिक मिरवणुकांना न्यायालयाचा विरोध नसला तरी त्यामुळे इतर नागरिकांना त्रास होता कामा नये, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची साऊंड सिस्टीम जप्त करून संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही पोलिसांना देण्यात आले आहेत.

हे निर्देश केवळ एका विशिष्ट सणापुरते मर्यादित नसून वर्षभरातील विविध धर्मांच्या मिरवणुका आणि उत्सवांनाही लागू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

नागपूरमध्येही DJ वर कडक निर्बंध

यापूर्वी नागपूर पोलिसांनी उच्च क्षमतेच्या डीजे सिस्टीमवर निर्बंध लागू केले होते. नागपूर खंडपीठानेही ध्वनीप्रदूषणाचे नियम प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना दिल्या असून विदर्भात 1 नोव्हेंबरपर्यंत या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश आहेत.

अहिल्यानगरमध्ये कारवाईचा इशारा

अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनीदेखील डीजेसंदर्भात न्यायालयाने आणि प्रशासनाने निश्चित केलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

दरम्यान, डीजेवरील निर्बंधांविरोधात काही व्यावसायिकांकडून आंदोलन करण्यात येत असतानाच शेवगावमध्ये झालेल्या गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमातील साऊंड सिस्टीमबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्या कार्यक्रमात आवाजाची निर्धारित मर्यादा ओलांडली असल्याचे आढळल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पुण्यात ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा चर्चेत

पुण्यात विद्यानंद बापट यांनी सण-उत्सवांतील ध्वनीप्रदूषण आणि वाहतुकीला होणारा अडथळा याविरोधात आवाज उठवला होता. त्यानंतर त्यांच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी पुण्यात नागरिकांनी मोर्चाही काढला होता.

आता मुंबई हायकोर्टानेच या प्रश्नाची सुमोटो दखल घेतल्याने राज्यभरात डीजे आणि मोठ्या साऊंड सिस्टीमविरोधातील नियमांची अंमलबजावणी नेमकी कशी केली जाते, याकडे लक्ष लागले आहे. या प्रकरणावर 22 सप्टेंबर रोजी तातडीची सुनावणी होणार आहे.

Inline Article Ad 728x90