प्रेयसीशी लग्नासाठी १० लाखांचा हट्ट; १८ वर्षीय मुलाने पोलीस वडिलांच्या डोक्यात झाडली गोळी, आईलाही संपवण्याचा प्रयत्न!
चंदिगढमध्ये प्रेयसीशी लग्न करण्याच्या हट्टातून १८ वर्षीय मुलाने आपल्या पोलीस हेड कॉन्स्टेबल वडिलांची गोळी झाडून हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आईचाही गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेष म्हणजे, आरोपी यापूर्वी दोन भावांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अपघातप्रकरणात जामिनावर बाहेर होता.
Image for Representational Purposes Only
चंदिगढ : प्रेयसीशी तातडीने लग्न करण्याच्या हट्टातून एका १८ वर्षीय तरुणाने आपल्या पोलीस हेड कॉन्स्टेबल वडिलांची गोळी झाडून हत्या केल्याची घटना चंदिगढमध्ये घडली आहे. वडिलांच्या हत्येनंतर आरोपीने आईचाही गळा आवळून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मात्र, आईने त्याच्या तावडीतून सुटका करून घेत शेजाऱ्यांकडे मदत मागितली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.
मृत हेड कॉन्स्टेबलचे नाव नितीन सिंह (४५) असून, ते चंदिगढ पोलीस मुख्यालयातील अकाऊंट्स विभागात कार्यरत होते. सेक्टर २२ येथील त्यांच्या सरकारी निवासस्थानी त्यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून गुन्ह्यात वापरल्याचा संशय असलेले गावठी पिस्तूल जप्त केले आहे.
लग्नासाठी तीन वर्षे थांबण्यास नकार; वडिलांकडे १० लाखांची मागणी
पोलीस अधिकारी सुदेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अरमान (१८) याला आपल्या प्रेयसीशी तातडीने लग्न करायचे होते. त्यासाठी तो गेल्या काही दिवसांपासून आई-वडिलांवर दबाव टाकत होता. मात्र, मुलाच्या लग्नासाठी कायदेशीर किमान वय २१ वर्षे असल्याने आई-वडिलांनी त्याला आणखी तीन वर्षे थांबण्याचा सल्ला दिला होता.
यावरून कुटुंबात वारंवार वाद होत होते. अरमानने लग्नासाठी वडिलांकडे १० लाख रुपयांची मागणीही केल्याचे समोर आले आहे. गुरुवारी संध्याकाळी याच विषयावरून पुन्हा वाद झाला आणि त्याचे पर्यवसान हत्येत झाल्याचा आरोप आहे.
वडिलांच्या हत्येनंतर आईचाही गळा आवळला!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाद वाढल्यानंतर अरमानने गावठी पिस्तुलातून वडिलांच्या डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर त्याने आईचाही गळा आवळून तिच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
मात्र, आईने कशीबशी सुटका करून घेत घराच्या छताकडे धाव घेतली. तेथून आरडाओरडा करत त्यांनी शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याचा बनाव
घटनेनंतर अरमानने घरात बाहेरील व्यक्तीने प्रवेश करून वडिलांवर गोळीबार केल्याचे भासवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र, चौकशीदरम्यान त्याच्या कथनातील विसंगती समोर आल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.
दोन भावांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अपघातप्रकरणात होता जामिनावर
या प्रकरणाच्या तपासादरम्यान अरमान यापूर्वी एका गंभीर अपघातप्रकरणात अटक झालेला असल्याचे समोर आले.
या वर्षाच्या सुरुवातीला मनिमांजरा परिसरात मित्राची महिंद्रा थार चालवत असताना त्याच्या वाहनाने एका दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात दुचाकीवरील दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात अटक झाल्यानंतर अरमानला न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.
आता वडिलांच्या हत्येप्रकरणात त्याला पुन्हा अटक करण्यात आली असून, चंदिगढ पोलीस पुढील तपास करत आहेत.