‘आम्हाला वेळ नाही, तुम्हीच अंत्यसंस्कार करा’; 80 वर्षीय वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाचं उत्तर, पोलिस केसची तंबी देताच...

छत्रपती संभाजीनगरमध्ये 80 वर्षीय वृद्धाच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाने अंत्यसंस्कारासाठी मृतदेह स्वीकारण्यास सुरुवातीला नकार दिल्याचा प्रकार समोर आला आहे. वृद्धाश्रमाच्या संचालिका उमा तुपे यांनी वारंवार संपर्क साधल्यानंतरही कुटुंबीयांकडून प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांत तक्रार करण्याचा इशारा दिला. त्यानंतर कुटुंबीय मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पोहोचल्याची माहिती आहे.

Ch. Sambhajinagar News

Ai Generated

छत्रपती संभाजीनगर : ज्या वडिलांनी मुलाला बोट धरून चालायला शिकवलं, त्याच वडिलांच्या अखेरच्या प्रवासासाठी मुलाकडे वेळ नसल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आला आहे. 80 वर्षीय वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मृतदेह स्वीकारण्यास मुलाने सुरुवातीला नकार दिल्याची माहिती आहे. अखेर वृद्धाश्रमाच्या संचालिकेने पोलिसांत तक्रार करण्याचा इशारा दिल्यानंतर कुटुंबीय मृतदेह ताब्यात घेण्यासाठी हजर झाले.

रेल्वे स्टेशन परिसरात अस्वस्थ अवस्थेत आढळले वृद्ध

काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन परिसरात 80 वर्षीय वृद्ध अर्धांगवायूमुळे अस्वस्थ अवस्थेत आढळले होते. त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांची रवानगी वृद्धाश्रमात करण्यात आली.

वृद्धाश्रमाच्या संचालिका उमा तुपे यांनी संबंधित वृद्धाच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यास सुरुवात केली. प्रयत्नांनंतर त्यांचा मुलगा आणि सून यांचा शोध लागला. मात्र, वृद्ध वडिलांना घरी नेण्याऐवजी त्यांना वृद्धाश्रमातच ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

‘घरात लग्न आहे, घर छोटं पडेल’

मिळालेल्या माहितीनुसार, वृद्धांना घरी नेण्याबाबत विचारणा केली असता कुटुंबीयांनी घरात लग्न असल्याचे कारण सांगितले. ‘घर छोटे पडेल, लग्न झाल्यानंतर बघू,’ असे सांगत त्यांना वृद्धाश्रमातच ठेवण्यात आल्याची माहिती संचालिकेने दिली.

दरम्यान, अर्धांगवायूचा त्रास वाढल्याने रविवारी सकाळी सुमारे 7 वाजता वृद्धाचा मृत्यू झाला. त्यानंतर उमा तुपे यांनी त्यांच्या मुलाला संपर्क साधत वडिलांचा मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्यास सांगितले.

‘तुम्हीच अंत्यसंस्कार उरकून घ्या’

मात्र, कुटुंबीयांकडून ‘आम्हाला वेळ नाही, तुम्हीच अंत्यसंस्कार उरकून घ्या. आम्हाला जमणार नाही,’ असे उत्तर मिळाल्याचा दावा वृद्धाश्रमाच्या संचालिकेने केला आहे.

वारंवार विनंती करूनही कुटुंबीयांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने उमा तुपे यांनी अखेर पोलिसांत तक्रार करून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला.

पोलिस कारवाईचा इशारा देताच कुटुंबीय हजर

पोलिसांत तक्रार करण्याचा इशारा दिल्यानंतर काही वेळातच कुटुंबीय वृद्धाचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी हजर झाल्याची माहिती आहे. त्यानंतर अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पडली.

वृद्धावस्थेत आई-वडिलांना आधाराची सर्वाधिक गरज असताना समोर आलेल्या या घटनेने पालक आणि मुलांच्या नात्याबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Inline Article Ad 728x90