ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJP आक्रमक; २ ऑक्टोबरपासून देशव्यापी आंदोलन, जंतर-मंतरपर्यंत लढा नेण्याचा इशारा
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीने २ ऑक्टोबरपासून मुंबईतून देशव्यापी आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. आंदोलनानंतर दिल्लीतील जंतर-मंतरवरही आंदोलन करण्याचा इशारा संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिला आहे. शिवाजी पार्कवरील आंदोलनाला पोलिसांची परवानगी नसतानाही आंदोलन करण्याची भूमिका CJP ने घेतली आहे.

मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टी अर्थात CJP ने आक्रमक भूमिका घेतली आहे. २ ऑक्टोबरपासून मुंबईतून देशव्यापी आंदोलन सुरू करण्यात येणार असून त्यानंतर देशातील विविध शहरांमध्ये आंदोलन केले जाईल, अशी घोषणा CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केली आहे.
ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील आणि पुढील टप्प्यात दिल्लीतील जंतर-मंतरवरही आंदोलन केले जाईल, अशी भूमिका दिपके यांनी मांडली. तसेच २०२५ मधील SIR प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित करत संबंधित मतदार यादी गोठवण्याची मागणी त्यांनी केली आहे. SIR संदर्भातील मतदारांची नावे वगळल्याच्या आरोपांवरून विरोधक आणि काही संघटनांनी निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले आहेत; निवडणूक आयोगाने मात्र त्याच्यावरील काही प्रमुख आरोप फेटाळले आहेत.
‘अटक करायची असेल तर करा’
मुंबईतील आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर दिपके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. आंदोलनादरम्यान अटक करायची असल्यास प्रशासनाने ती करावी, पण आंदोलन थांबणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
मुंबई पोलिसांनी शिवाजी पार्कवरील प्रस्तावित आंदोलनाला परवानगी दिलेली नसल्याचे वृत्त आहे. त्यानंतरही २ ऑक्टोबरला शिवाजी पार्क परिसरात ‘जेल भरो’ आंदोलन करण्याची घोषणा CJP कडून करण्यात आली आहे.
दिपके यांनी निवडणूक व्यवस्थेतील पारदर्शकतेचा मुद्दाही उपस्थित केला. निवडणूक प्रक्रियेत काम करणारे अधिकारी निष्पक्ष आणि पारदर्शक असले पाहिजेत, असे सांगत त्यांनी जुन्या मतदार याद्यांच्या आधारे निवडणुका घेण्याची मागणी केली.
‘परवानगी मिळो किंवा न मिळो, आंदोलन करणार’
आंदोलनासाठी परवानगी मिळालेली नसली तरी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचे दिपके यांनी म्हटले. शिवाजी पार्कवर राजकीय सभा होऊ शकतात, तर आंदोलनाला परवानगी का दिली जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
CJP ने २ ऑक्टोबरच्या आंदोलनाची सुरुवात मुंबईतील शिवाजी पार्क परिसरातून करण्याची घोषणा केली आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन शांततापूर्ण आणि घटनात्मक मार्गाने करण्याचे म्हटले आहे.
४ ऑक्टोबरच्या आंदोलनालाही CJP चा पाठिंबा
दरम्यान, २ ऑक्टोबरच्या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवल्याचे वृत्त आहे. मनसे आणि शिवसेना (उबाठा) यांनी ४ ऑक्टोबरला स्वतंत्र आंदोलनाची घोषणा केली असून त्या आंदोलनात CJP चे कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे दिपके यांनी म्हटले आहे.
पक्षीय ओळखी बाजूला ठेवून निवडणूक प्रक्रिया आणि मतदार यादीसंबंधीच्या मुद्द्यांवर नागरिकांनी एकत्र यावे, असे आवाहनही दिपके यांनी केले आहे.