अभिजित दिपके अडचणीत? वडिलांच्या मालमत्तेसह १ कोटींच्या निधीच्या चौकशीची मागणी
कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) आणि तिचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या आर्थिक व्यवहारांबाबत चौकशीची मागणी करण्यात आली आहे. सुरतमधील आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी अभिजित दिपके यांचे वडील भगवान दीपके यांच्या मालमत्तेची तसेच कपिल सिबल यांनी जाहीर केलेल्या १ कोटी रुपयांच्या कायदेशीर संरक्षण निधीची चौकशी करण्यासाठी निवडणूक आयोग, आयकर विभाग आणि CBIC यांना पत्र पाठवले आहे. सीजेपीची नोंदणी, निधीचा स्रोत आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी व्हावी, अशी त्यांची मागणी आहे. मात्र, या प्रकरणात अद्याप कोणत्याही सरकारी यंत्रणेने अधिकृत चौकशी सुरू झाल्याची घोषणा केलेली नाही आणि सीजेपी, अभिजित दिपके किंवा कपिल सिबल यांनीही या मागण्यांवर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) आणि तिचे संस्थापक अभिजित दिपके यांच्याविरोधात आर्थिक व्यवहारांबाबत तक्रार करण्यात आली आहे. सुरतमधील आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी अभिजित दिपके यांचे वडील भगवान दीपके यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच सीजेपीसाठी जाहीर करण्यात आलेल्या १ कोटी रुपयांच्या कायदेशीर संरक्षण निधीचीही तपासणी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अमित तिवारी यांनी निवडणूक आयोग, आयकर विभाग आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळ (CBIC) यांना पत्र पाठवले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सीजेपी ही नोंदणीकृत संघटना आहे की नाही, याची पडताळणी करण्यात यावी. जर संघटना नोंदणीकृत नसेल, तर राजकीय पक्षाच्या नावाने निधी उभारला जात आहे का, याची चौकशी होणे आवश्यक असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
तिवारी यांनी आणखी एक मुद्दा उपस्थित केला आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिबल यांनी सीजेपीच्या कायदेशीर संरक्षण निधीसाठी जाहीर केलेल्या १ कोटी रुपयांच्या देणगीचा स्रोत, त्याचा वापर आणि त्या निधीवर जीएसटी लागू होतो का, याचीही तपासणी करण्याची त्यांनी मागणी केली आहे.
दरम्यान, २७ जुलै रोजी सीजेपीने पेपरफुटी प्रकरणानंतर आंदोलने करणाऱ्या आणि विविध गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना कायदेशीर मदत देण्यासाठी 'कायदेशीर संरक्षण निधी' स्थापन करण्याची घोषणा केली होती. या निधीसाठी कपिल सिबल यांनी १ कोटी रुपयांचे योगदान जाहीर केले होते. तसेच देशभरातील वकिलांनी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले होते.
कोण आहेत अभिजित दिपके?
३० वर्षीय अभिजित दिपके हे छत्रपती संभाजीनगर येथील डिजिटल मीडिया स्ट्रॅटेजिस्ट आहेत. त्यांनी पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेतले असून सध्या अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात उच्च शिक्षण घेत आहेत. सोशल मीडियावरील त्यांच्या एका पोस्टनंतर सुरू झालेली मोहीम पुढे पेपरफुटीविरोधी आंदोलनात बदलली. या आंदोलनात अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक हे प्रमुख चेहरे म्हणून समोर आले.
सध्या अमित तिवारी यांनी केलेल्या तक्रारीनंतर सीजेपीची नोंदणी, आर्थिक व्यवहार आणि कायदेशीर संरक्षण निधीबाबत चौकशी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, संबंधित यंत्रणांकडून अद्याप कोणतीही अधिकृत चौकशी सुरू झाल्याची माहिती देण्यात आलेली नाही. तसेच सीजेपी, अभिजित दिपके आणि कपिल सिबल यांनीही या तक्रारींवर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.