सातव्या थरावर चिमुकला गोविंदा... सलामी दिली अन् अचानक सेफ्टी बेल्ट तुटला! खाली कोसळला, बदलापूरमध्ये थरारक प्रसंग
बदलापूरमध्ये दहीहंडी उत्सवादरम्यान थरारक घटना घडली. सातव्या थरावर चढलेल्या चिमुकल्या गोविंदाने सलामी दिल्यानंतर अचानक सेफ्टी बेल्ट तुटला आणि तो थेट खाली कोसळला. सुदैवाने अनर्थ टळला. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर गोविंदांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
बदलापूर : दहीहंडी उत्सवादरम्यान गोविंदांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बदलापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘माखन चोर दहीकाला उत्सवा’दरम्यान थरारक घटना घडली. सातव्या थरावर चढलेल्या चिमुकल्या गोविंदाने सलामी दिल्यानंतर अचानक त्याचा सेफ्टी बेल्ट तुटला आणि तो थेट खाली कोसळला. सुदैवाने या घटनेत मोठा अनर्थ टळला.
शिवसेना युवा सेना शहर प्रमुख मितेश धुळे यांच्या आयोजनातून बदलापूरमध्ये दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माखन चोरहंडी फोडण्यासाठी प्रज्वल प्रतिष्ठानच्या माध्यमातून गोविंदा पथकाने सात थरांची सलामी दिली.
सातव्या थरावर चिमुकला गोविंदा चढला होता. सातव्या थराला सलामी दिल्यानंतर अचानक त्याचा सेफ्टी बेल्ट तुटला. त्यानंतर हा चिमुकला थेट खाली कोसळला. हा प्रकार घडताच उपस्थित नागरिक आणि गोविंदा पथकांमध्ये एकच खळबळ उडाली.
चिमुकला खाली कोसळताच त्याला तातडीने सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. सुदैवाने या घटनेत मोठी दुर्घटना टळली. मात्र, दहीहंडीच्या उंच थरांवर गोविंदांच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येणारा सेफ्टी बेल्टच तुटल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आला असून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. सेफ्टी बेल्ट नेमका कोणत्या कारणामुळे तुटला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. आयोजकांकडून या प्रकाराची चौकशी केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
गोविंदांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसह राज्यातील विविध भागांत दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. उंच दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांना अनेक थर रचावे लागतात. काही ठिकाणी नऊ ते दहा थरांपर्यंत मानवी मनोरे उभारले जातात.
या थरांच्या सर्वात वरच्या भागावर लहान मुलांना चढवले जाते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी बेल्टसह विविध सुरक्षा उपाययोजना करण्यावर भर दिला जातो. मात्र, बदलापूरमध्ये सुरक्षा म्हणून लावण्यात आलेला सेफ्टी बेल्टच तुटल्याने गोविंदांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.