तुकाराम मुंढेंना थेट मुख्यमंत्री करा! अमित शाहांना पत्र; राज ठाकरेंचंही कौतुक, ‘आम्ही गिरगावकर’ची मोठी मागणी

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईचे कौतुक करत ‘आम्ही गिरगावकर’ संघटनेने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना थेट पत्र लिहिले आहे. मुंढेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली असून, महाराष्ट्र आणि मराठीच्या हितासाठी कठोर निर्णय घेण्यासाठी मुंढे सक्षम असल्याचा दावा संघटनेने केला आहे.

Tukaram Mundhe_ Amit Shah

Ai Generated

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. भेसळखोरांविरोधात कठोर भूमिका घेतल्याने मुंढेंचे कौतुक होत असतानाच आता त्यांच्या नावाची थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही मागणी राज्यातील एका संघटनेने थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे.

‘आम्ही गिरगावकर संघटने’ने अमित शाह यांना पत्र लिहून तुकाराम मुंढे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे. या पत्रात महाराष्ट्र आणि मराठीच्या हितासाठी कठोर निर्णय घेण्याची क्षमता मुंढे यांच्यामध्ये असल्याचा दावा करण्यात आला आहे. यासोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचेही कौतुक करण्यात आले आहे.

नेमकी कोणती मागणी करण्यात आली?

मुंबईतील मराठी भाषिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत संघटनेने विविध मुद्दे पत्रातून उपस्थित केले आहेत. परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी येत नसतानाही परवाने दिले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच मुंबईतील राखीव मैदाने, आरक्षित भूखंड आणि महत्त्वाच्या जागांबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

‘मराठीच्या हितासाठी मुंढेच पाहिजेत’

महाराष्ट्र आणि मराठीच्या हिताचे निर्णय कोणताही दबाव न जुमानता घेण्यासाठी तुकाराम मुंढे सक्षम असल्याचे पत्रात म्हटले आहे. मराठी भाषिकांवर होणारा अन्याय रोखण्यासाठी नवीन कायदा करण्याची मागणीही करण्यात आली आहे. नवीन इमारतींमध्ये मराठी माणसांसाठी घरे राखीव ठेवण्यासारख्या उपाययोजनांसाठी मुंढे यांच्यासारख्या कठोर अधिकाऱ्याची गरज असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.

राज ठाकरेंचंही पत्रातून कौतुक

मुंबईच्या प्रश्नांवर भूमिका घेणाऱ्या राज ठाकरे यांचेही ‘आम्ही गिरगावकर’ संघटनेने कौतुक केले आहे. बाळासाहेब ठाकरे हयात नसल्याचा संदर्भ देत मुंबईवर वर्चस्व मिळवण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे. हे रोखण्यासाठी राज ठाकरे भक्कम असल्याचेही संघटनेने म्हटले आहे.

‘उग्र चळवळीची ठिणगी ठरणार?’

महाराष्ट्र आणि मराठीच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका करत संघटनेने गंभीर इशाराही दिला आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीपेक्षा उग्र चळवळीची ही ठिणगी ठरणार, असा दावा पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे तुकाराम मुंढेंना मुख्यमंत्री करण्याच्या या मागणीवर आता राजकीय वर्तुळात काय प्रतिक्रिया उमटतात, याकडे लक्ष लागले आहे.

 

Inline Article Ad 728x90