पुणे शिक्षक मतदारसंघात दत्तात्रय सावंतांची प्रचाराला सुरुवात; पंढरपुरात फोडला नारळ, भाजपची उमेदवारी मिळणार का?

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील नामदेव पायरी येथे प्रचाराचा शुभारंभ केला. भाजपसोबत उमेदवारीबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगत त्यांनी येत्या दोन दिवसांत निर्णय होण्याचे संकेत दिले आहेत.

Dattatray_Sawant

पंढरपूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीसाठी माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी प्रचाराचा अधिकृत शुभारंभ केला आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरातील नामदेव पायरीचे दर्शन घेऊन त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी पंढरपूर तालुक्यातील शेकडो शिक्षक उपस्थित होते. दुसरीकडे, सावंत यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.


भाजपची उमेदवारी मिळणार? सावंतांनी दिले महत्त्वाचे संकेत

प्रचाराच्या शुभारंभानंतर माध्यमांशी बोलताना दत्तात्रय सावंत यांनी आपल्या उमेदवारीबाबत भूमिका स्पष्ट केली. गेल्या २६ वर्षांपासून शिक्षकांच्या प्रश्नांसाठी काम करत असल्याचे सांगत त्यांनी संपूर्ण मतदारसंघातील ५८ तालुक्यांमध्ये शिक्षक सहकाऱ्यांनी प्रचाराला सुरुवात केल्याचा दावा केला.

भाजपसह विविध राजकीय पक्षांशी आपली चर्चा सुरू असून येत्या दोन दिवसांत उमेदवारीबाबत निर्णय होऊ शकतो, असे संकेत सावंत यांनी दिले. मात्र, त्यांची भाजपकडून अधिकृत उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही. यापूर्वी त्यांनी यंदाची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार नसल्याचेही स्पष्ट केले होते.


महायुतीमध्ये उमेदवारीसाठी अनेक इच्छुक

पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीमध्ये अनेक इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. शिवसेनेकडून मंगेश चिवटे निवडणुकीच्या तयारीत असून सचिन सानप आणि कौस्तुभ गावडे यांचीही नावे चर्चेत आहेत. भाजपच्या संभाव्य उमेदवारांमध्ये दत्तात्रय सावंत यांच्यासह डॉ. बी. पी. रोंगे यांच्या नावाची चर्चा होत आहे.


दरम्यान, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघांबाबत भाजपची भूमिका मांडली आहे. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होऊन उमेदवारीचा निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एकदा विजय, मागील निवडणुकीत दुसरे स्थान

दत्तात्रय सावंत यांनी यापूर्वी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. गेल्या निवडणुकीत ते दुसऱ्या स्थानावर राहिले होते. शिक्षक संघटनांमधील आपल्या संपर्काच्या आधारे त्यांनी पुन्हा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात सध्या काँग्रेसचे जयंत आसगावकर विद्यमान आमदार आहेत. या मतदारसंघात पुणे, सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे.


पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान, तर २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

  • २९ सप्टेंबर २०२६ : निवडणुकीची अधिसूचना जारी
  • ६ ऑक्टोबर २०२६ : उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत
  • ७ ऑक्टोबर २०२६ : उमेदवारी अर्जांची छाननी
  • ९ ऑक्टोबर २०२६ : उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत
  • २३ ऑक्टोबर २०२६ : सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान
  • २७ ऑक्टोबर २०२६ : मतमोजणी आणि निकाल

प्रचाराला सुरुवात केल्यानंतर दत्तात्रय सावंत यांना कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळणार आणि महायुतीकडून अधिकृत उमेदवार म्हणून कोणाच्या नावाची घोषणा होणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

Inline Article Ad 728x90