शेतात सापडला 16 वर्षीय मुलीचा मृतदेह, CCTV मधील एका टेम्पोने उलगडलं रहस्य; दिल्लीतील प्रकरणात 4 जण ताब्यात

दिल्लीतील स्वरूप नगर परिसरात 16 वर्षीय मुलीचा मृतदेह शेतात आढळल्यानंतर पोलिसांनी 50 हून अधिक CCTV कॅमेरे तपासले. संशयास्पद टेम्पोच्या हालचालींचा माग काढत पोलिसांनी 19 वर्षीय तरुणाला अटक केली असून तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक तपास आहे.

Delhi_Gang_Rape_Case

दिल्ली : बाह्य दिल्लीतील स्वरूप नगर परिसरात एका शेतात 16 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांसमोर सर्वात पहिला प्रश्न होता—ही मुलगी नेमकी कोण आणि ती या ठिकाणी कशी पोहोचली? घटनास्थळी कोणताही ठोस पुरावा सहजपणे मिळत नसताना परिसरातील CCTV फुटेजमध्ये दिसलेल्या एका टेम्पोने तपासाला निर्णायक दिशा दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, कुशक रोडजवळील शेतात रविवारी सकाळी मुलीचा मृतदेह आढळला. मृतदेहाची अवस्था खराब झाल्यामुळे सुरुवातीला तिची ओळख पटवणे कठीण झाले होते. त्यानंतर परिसरातील नागरिकांकडून माहिती घेत पोलिसांनी तिची ओळख निश्चित केली.

शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबीयांच्या जबाबानंतर पोलिसांनी हत्या, लैंगिक अत्याचार आणि पुरावे नष्ट करण्यासंदर्भात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

50 हून अधिक CCTV तपासले; एका टेम्पोवर संशय

या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांच्या पथकांनी घटनास्थळाच्या परिसरातील 50 हून अधिक CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. संशयित कालावधीत एका टेम्पोची हालचाल वारंवार दिसून आल्याने तपास अधिकाऱ्यांचे लक्ष त्या वाहनाकडे गेले.

फुटेजमध्ये वाहनाचा नोंदणी क्रमांक स्पष्ट दिसत नसल्याने पोलिसांनी स्थानिक पातळीवर चौकशी सुरू केली. अखेर टेम्पोचा शोध घेण्यात आला आणि त्याच्या चालकाची चौकशी करण्यात आली.

चौकशीत चालकाने त्याचा 17 वर्षीय लहान भाऊही हे वाहन वापरत असल्याची माहिती पोलिसांना दिली. CCTV फुटेजमध्ये त्या वाहनात चार तरुण असल्याचेही दिसून आल्याचा दावा तपास अधिकाऱ्यांनी केला.

चार जणांचा शोध सुरू झाला अन् तपासाला मिळालं वळण

फुटेज आणि स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांची ओळख निश्चित केली. मात्र ते घरातून निघून गेल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी रात्री शोधमोहीम राबवत चार जणांना ताब्यात घेतले.

पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणात शिवम गणेश नावाच्या 19 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे, तर 16 आणि 17 वयोगटातील तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्ह्याशी संबंधित असल्याच्या संशयावरून दोन चाकू आणि काही कपडेही जप्त करण्यात आले आहेत.

मुलगी 17 वर्षीय ओळखीच्या मुलाला भेटण्यासाठी गेल्याचा संशय

प्राथमिक तपासात पीडित मुलगी आरोपींपैकी एका 17 वर्षीय मुलाच्या ओळखीची होती आणि त्याला भेटण्यासाठी गेली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्याबाबत तिने सांगितल्यानंतर परिस्थिती आणखी गंभीर झाली आणि तिची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक संशय आहे.

मुलीवर नेमका कुठे अत्याचार झाला, वाहनाचा गुन्ह्यात नेमका कसा वापर करण्यात आला आणि प्रत्येक आरोपीची स्वतंत्र भूमिका काय होती, याचा तपास अद्याप सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पालकांकडून मिसिंग तक्रार का झाली नव्हती?

या प्रकरणातील आणखी एक बाब तपासात समोर आली. संबंधित मुलगी काही काळापासून कुटुंबापासून वेगळी राहत होती आणि नोकरीच्या शोधात होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

त्यामुळे ती दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती तिच्या पालकांना नसल्याचे सांगण्यात आले. परिणामी, पोलिसांकडे तिच्या बेपत्ता होण्याची कोणतीही तक्रार दाखल झालेली नव्हती.

स्थानिक नागरिकांनी यापूर्वी मुलीला परिसरात पाहिले असल्याने त्यांच्या मदतीने अखेर तिची ओळख पटवण्यात आली.

फॉरेन्सिक अहवालाकडे पोलिसांचे लक्ष

पोलीस उपायुक्त शोभित सक्सेना यांच्या म्हणण्यानुसार, CCTV फुटेज, स्थानिक चौकशी आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयितांपर्यंत पोहोचण्यात आले.

आता घटनांचा नेमका क्रम, प्रत्येक आरोपीची भूमिका आणि आणखी कोणाचा या गुन्ह्यात सहभाग आहे का, याचा तपास करण्यात येत आहे. जप्त करण्यात आलेल्या वस्तू फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आल्या असून त्यातून मिळणाऱ्या पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

Inline Article Ad 728x90