शतक ठोकूनही पडिक्कल अचानक मैदानाबाहेर; LIVE मॅचमध्ये नेमकं काय घडलं?

श्रीलंका इलेव्हनविरुद्धच्या सराव सामन्यात देवदत्त पडिक्कलने 121 चेंडूंमध्ये 14 चौकारांच्या मदतीने वादळी शतक झळकावलं. शतकानंतर तो रिटायर्ड हर्ट झाला. या खेळीमुळे पहिल्या कसोटीत तिसऱ्या क्रमांकासाठी त्याची दावेदारी मजबूत झाली असून साई सुदर्शनच्या फिटनेसच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियासमोर निवडीचा पेच निर्माण झाला आहे.

devdutt padikkal

श्रीलंका इलेव्हनविरुद्ध सुरू असलेल्या तीन दिवसीय सराव सामन्यात भारतीय फलंदाज देवदत्त पडिक्कलने दमदार शतक झळकावत पहिल्या कसोटीच्या प्लेइंग-11 मधील आपली दावेदारी आणखी मजबूत केली आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या पडिक्कलने अवघ्या 121 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केलं. मात्र, शतक झळकावल्यानंतर तो रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला.

121 चेंडूत शतक, 14 चौकारांचा तडाखा

भारतीय संघ व्यवस्थापनासाठी हा सराव सामना फलंदाजांचा फॉर्म आणि श्रीलंकेतील परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. याच संधीचा पडिक्कलने पुरेपूर फायदा घेतला.

पडिक्कलने सुरुवातीपासूनच आत्मविश्वासाने फलंदाजी केली. त्याने 61 चेंडूंमध्ये सहा चौकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर त्याने आक्रमक फलंदाजी सुरूच ठेवली आणि अवघ्या 121 चेंडूंमध्ये शतकाला गवसणी घातली. त्याच्या शतकी खेळीत तब्बल 14 चौकारांचा समावेश होता.

शतक पूर्ण केल्यानंतर मात्र पडिक्कल रिटायर्ड हर्ट झाला. त्यानंतर ऋषभ पंत फलंदाजीसाठी मैदानात आला.

तिसऱ्या क्रमांकासाठी पडिक्कलची दावेदारी मजबूत

पडिक्कलच्या या शानदार खेळीमुळे भारतीय संघाच्या पहिल्या कसोटीतील प्लेइंग-11 मध्ये तिसऱ्या क्रमांकासाठीची स्पर्धा आणखी वाढली आहे.

साई सुदर्शन हा तिसऱ्या क्रमांकासाठीचा प्रमुख पर्याय मानला जात आहे. मात्र, त्याच्या फिटनेसबाबत अद्याप प्रश्नचिन्ह आहे. तो सध्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये रिहॅबिलिटेशनमधून जात असल्याने पहिल्या कसोटीसाठी त्याच्या उपलब्धतेबाबत अनिश्चितता आहे.

अशा परिस्थितीत पडिक्कलने मिळालेल्या संधीचं सोनं करत थेट शतक झळकावल्याने टीम मॅनेजमेंटसमोर आणखी एक मजबूत पर्याय निर्माण झाला आहे.

भारताची सुरुवात धक्कादायक, पडिक्कलने डाव सावरला

या सामन्यात श्रीलंका इलेव्हनने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवसअखेर 90 षटकांत 8 विकेट गमावत 363 धावा केल्या. निशान मदुशंकाने 66, रविंद्र रासांथाने 71 आणि कर्णधार सोनल दिनूषाने 52 धावांची खेळी केली.

भारताच्या डावाची सुरुवात मात्र धक्कादायक झाली. दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्याच चेंडूवर यशस्वी जायस्वाल शून्यावर बाद झाला. त्यानंतर पडिक्कलने डावाची सूत्रं हाती घेतली आणि केएल राहुलसोबत महत्त्वाची भागीदारी करत भारताचा डाव सावरला.

तिसऱ्या क्रमांकावर येऊन दबावाच्या परिस्थितीत शतक झळकावत पडिक्कलने आपली क्षमता दाखवून दिली आहे. आता त्याला पहिल्या कसोटीत अंतिम संधी मिळते का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

Inline Article Ad 728x90