खासगी शाळेची फी, मात्र शाळा दुगड संस्थेची? डायमंड इंटरनॅशनल स्कूलवर पालकांचा फोर्जरीचा आरोप

पुण्यातील कोंढवा येथील डायमंड इंटरनॅशनल स्कूलवर पालकांनी फोर्जरीचे गंभीर आरोप करत आंदोलन छेडले आहे. पालकांचा दावा आहे की, मुलांचा प्रवेश डायमंड इंटरनॅशनल स्कूल (CBSE)मध्ये करून घेतला, खासगी शाळेप्रमाणे शुल्कही आकारण्यात आले. मात्र, शाळा सोडल्यानंतर देण्यात आलेल्या लीव्हिंग सर्टिफिकेट (LC) वर कै. जदाबाई दुगड स्कूलचे नाव असल्याचे समोर आले.

पालकांच्या म्हणण्यानुसार, डायमंड इंटरनॅशनल स्कूलच्या परिसरात किंवा प्रवेश प्रक्रियेदरम्यान कै. जदाबाई दुगड स्कूलचा कोणताही उल्लेख करण्यात आला नव्हता. त्यामुळे आपली मुले डायमंड इंटरनॅशनल स्कूलमध्येच शिकत असल्याची त्यांची समजूत होती. मात्र, LC आणि विद्यार्थ्यांचा UDISE क्रमांकही दुगड स्कूलच्या नावावर नोंदविण्यात आल्याचा दावा पालकांनी केला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर पालकांनी शाळा प्रशासनावर फोर्जरीचा आरोप केला आहे.

या प्रकरणात संतप्त पालक रस्त्यावर उतरले असून, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

या विषयाचा पाठपुरावा आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष सैफ शेख करत असून, संबंधित शासकीय यंत्रणांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, या सर्व आरोपांबाबत डायमंड इंटरनॅशनल स्कूलची अधिकृत बाजू अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे चौकशीनंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

dugad 2


Inline Article Ad 728x90