कॅफेत ग्राहकांशी गैरवर्तन महागात पुण्यातील PSI संदीप कदम निलंबित
पुणे : डेक्कन पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) संदीप कदम यांना कॅफेमध्ये ग्राहक आणि कर्मचाऱ्यांशी कथित गैरवर्तन केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस विभागाने ही कारवाई केली.
Shoaib Nadafपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ जून रोजी मध्यरात्री गस्तीदरम्यान संदीप कदम यांनी शिरोळे रोडवरील फ्लाइंग जिप्सी कॅफेला भेट दिली. त्यावेळी कॅफे बंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. यावेळी त्यांनी काउंटरवरील कॉफीचे ग्लास आणि खाद्यपदार्थ काठीने खाली पाडल्याचा, तसेच ग्राहकांना तातडीने बाहेर जाण्यास सांगत कर्मचाऱ्यांशी दमदाटी आणि अर्वाच्य भाषेत बोलल्याचा आरोप आहे.
संपूर्ण प्रकार कॅफेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची विभागीय चौकशी करण्यात आली. चौकशीत संबंधित अधिकाऱ्याचे वर्तन पोलीस दलाच्या शिस्तीला आणि प्रतिमेला बाधा पोहोचवणारे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी निलंबनाचे आदेश जारी केले.
दरम्यान, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यापूर्वीच हॉटेल, रेस्टॉरंट, बार आणि पब चालकांसाठी नियमावली जारी केली असून, कायद्याची अंमलबजावणी करताना पोलीस कर्मचाऱ्यांनीही नियमानुसार आणि व्यावसायिक पद्धतीने वागण्याच्या सूचना दिल्या आहेत.