दरे गावात पोहोचताच एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला; ‘पोटदुखीवर झाड लावणार, नाहीतर…’; लंडन दौऱ्यावरही दिलं उत्तर

गणेशोत्सवानिमित्त दरे गावात आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. आपण गावी आलो, दिल्लीत गेलो किंवा लंडनला गेलो तरी काही विरोधकांना ‘पोटदुखी’ होते, असं म्हणत त्यांनी टोला लगावला. एवढंच नाही तर पोटदुखीवर कोणतं झाड आहे ते शोधून त्याची लागवड करणार असल्याचं सांगत त्यांनी आणखी एक विधान केलं. यावेळी शिंदेंनी दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांचे पंचनामे आणि बांबू लागवडीवरही भाष्य केलं.

Eknath_Shinde

सातारा : गणेशोत्सवानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या दरे गावात आले आहेत. दरे गावातील आपल्या शेतात विविध प्रकारचे कृषी प्रयोग करणाऱ्या शिंदेंनी यावेळी शेतीची पाहणी केली. जागतिक बांबू दिनाच्या निमित्ताने त्यांनी बांबूची लागवड केली. मात्र, यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी केलेल्या एका विधानाने राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या दरे गावातील भेटीवरून यापूर्वीही राजकीय टीका झाली आहे. त्यातच त्यांच्या लंडन दौऱ्यावरूनही विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले होते. याबाबत विचारण्यात आल्यानंतर शिंदेंनी विरोधकांना आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिलं.

‘मी नाराज नाही, गणेशोत्सवासाठी गावी आलोय’

“मी गणेशोत्सवानिमित्त दरे गावी आलेलो आहे. मी नाराज नाही,” असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. मात्र, त्यानंतर त्यांनी विरोधकांना उद्देशून ‘पोटदुखी’चा उल्लेख करत टोला लगावला.

“मी या भागात आलो की नेहमी काही लोकांना पोटदुखी होते. त्यामुळे आता पोटदुखीवर कोणतं झाड आहे ते बघणार आहे आणि त्याचीदेखील लागवड करणार आहे किंवा त्यांना जमाल गोटा दिला पाहिजे,” असं शिंदे म्हणाले.

गावी आलो, दिल्लीला गेलो, लंडनला गेलो तरी...

लंडन दौऱ्यावरून झालेल्या टीकेवरही एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं. “मी गावी आलो, दिल्लीत गेलो आणि लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी होते. विरोधकांच्या आरोपांना टीका करून उत्तर देणार नाही. मी कामातून उत्तर देईन. मी कामाचा माणूस आहे,” असं शिंदे म्हणाले.

दुष्काळी भागाचा दौरा करणार

राज्यातील काही भागांतील पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीवरही शिंदेंनी प्रतिक्रिया दिली. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी सांगितलं.

संबंधित भागांचे पालकमंत्री दौरे करत असून आपणही लवकरच दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या भागांना भेट देणार असल्याचं शिंदेंनी सांगितलं. ज्या भागांमध्ये पिकं करपली आहेत, तिथे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्याचंही त्यांनी नमूद केलं.

बांबू लागवडीवर शिंदेंचा भर

जागतिक बांबू दिनानिमित्त एकनाथ शिंदे यांनी आपल्या शेतात बांबूची लागवड केली. बांबूपासून अनेक उपयोगी उत्पादने तयार करता येतात आणि इथेनॉलसारख्या क्षेत्रातही त्याचा उपयोग होऊ शकतो, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

दरे गावच्या शेतात वेगवेगळे प्रयोग

एकनाथ शिंदे यांनी दरे गावातील आपल्या शेतीत यापूर्वीही विविध पिकांचे प्रयोग केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, शेतात सफरचंद आणि ब्ल्यूबेरीसह कापूर आणि हिंगाच्या झाडांचीही लागवड करण्यात आली आहे.

ब्ल्यूबेरीची मोठ्या प्रमाणावर आयात केली जाते. महाराष्ट्रातील वातावरणातही या पिकाची लागवड करण्याच्या शक्यता तपासण्यासाठी प्रयोग केल्याचं शिंदे यांनी सांगितलं.

एकीकडे बांबू आणि इतर पिकांचे प्रयोग, तर दुसरीकडे लंडन दौरा आणि दरे गावातील वास्तव्यावरून होणाऱ्या राजकीय टीकेला दिलेलं प्रत्युत्तर यामुळे एकनाथ शिंदे यांचा दरे गावातील हा दौरा पुन्हा चर्चेत आला आहे.

Inline Article Ad 728x90