दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकनाथ शिंदेंचे मोठे निर्देश! मंत्र्यांना बांधावर जाण्याचे आदेश; तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत. पिकांचे तातडीने पंचनामे करण्यासह गावोगावी जनता दरबार घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारसोबत शिवसेनाही मदत करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
.jpg)
मुंबई : राज्यातील अनेक भागांत पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या मदतीबाबत चर्चा करण्यात आली. नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्यावर भर देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढणे ही आमची जबाबदारी
पावसाअभावी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. बळीराजा हा देशाचा अन्नदाता असून सरकारच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकऱ्यांचा असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढणे ही सरकारची जबाबदारी आहे. यापूर्वीही अतिवृष्टीसह विविध नैसर्गिक संकटांच्या काळात सरकारने शेतकऱ्यांना मदत केली आहे. आताही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.
शिवसेनेच्या मंत्र्यांना बांधावर जाण्याचे आदेश
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना आपापल्या भागातील दुष्काळग्रस्त गावांना भेटी देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मंत्र्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी करावी आणि त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच गावोगावी जनता दरबार घेऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्याच्या सूचनाही शिंदे यांनी दिल्या. शिवसेनेच्या प्रत्येक मंत्र्याने प्रत्यक्ष मैदानात उतरून उद्यापासूनच कामाला लागावे, असे आदेश त्यांनी दिले आहेत.
पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्यालाही प्राधान्य
दुष्काळामुळे शेतीबरोबरच अनेक भागांत पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या चाऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे पाणीटंचाई दूर करण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्यालाही प्राधान्य देण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आपणही दुष्काळग्रस्त भागांचा पाहणी दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीचे पंचनामे करावेत आणि त्यानुसार पुढील मदतीची कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
सरकारसोबत शिवसेनाही करणार मदत
येत्या एक ते दोन महिन्यांत सरकारकडून शेतकऱ्यांना मदत केली जाईल, असे शिंदे यांनी सांगितले. याशिवाय शिवसेनाही मदतीची जबाबदारी स्वीकारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्य सरकारने दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकसानीचे पंचनामे आणि प्राथमिक पाहणीच्या आधारे पुढील मदतीबाबत निर्णय घेतला जाणार आहे.