पत्नीशी वाद अन् पोटच्या ९ महिन्यांच्या बाळाला स्कायवॉकवरून फेकलं! मुंबईत बापाचं धक्कादायक कृत्य
मुंबईतील घाटकोपरमध्ये पत्नीशी झालेल्या वादातून एका पित्याने आपल्या अवघ्या नऊ महिन्यांच्या मुलाला स्कायवॉकवरून खाली फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत बाळ गंभीर जखमी झाले असून, त्याच्यावर शीव रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे.
मुंबई : मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात रविवारी (२५ ऑक्टोबर) रात्री संतापजनक घटना घडली. पत्नीशी झालेल्या वादातून एका व्यक्तीने आपल्या अवघ्या नऊ महिन्यांच्या बाळाला स्कायवॉकवरून खाली फेकल्याचा आरोप आहे. या घटनेत बाळ गंभीर जखमी झाले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरती शेख (२२) या घाटकोपरमधील सर्वोदय नगर परिसरात राहतात. दोन वर्षांपूर्वी त्यांचा जाफर शेख (२३) याच्याशी विवाह झाला होता. त्यांना आरव नावाचा नऊ महिन्यांचा मुलगा आहे. जाफरचा कपडे विक्रीचा व्यवसाय असून, त्याला नशेचे व्यसन असल्याने पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे.
पत्नीशी वाद सुरू असतानाच बाळाला खाली फेकल्याचा आरोप
रविवारी रात्री दहाच्या सुमारास आरती आपल्या बाळासह घाटकोपर पूर्व रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉकवर उभ्या होत्या. त्यावेळी जाफर तिथे आला आणि दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला. वादादरम्यान जाफरने बाळाला घेण्याचा प्रयत्न केला. आरतीने विरोध केल्याने संतापलेल्या जाफरने कथितपणे बाळाला थेट स्कायवॉकवरून खाली फेकले.
घटनेनंतर आरतीने स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाळाला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी शीव रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या बाळावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, आरती यांच्या तक्रारीवरून घाटकोपर पोलिसांनी जाफर शेखविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.