इन्स्टाग्राम रील पाहून घरातच छापल्या 100-500 रुपयांच्या बनावट नोटा; गुजरातमध्ये भाजी विक्रेता अटकेत

गुजरातमधील राजकोट येथे एका भाजी विक्रेत्याने इन्स्टाग्राम रील्स आणि टेलिग्रामवरील माहितीच्या आधारे घरातच 100 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटा छापल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करत प्रिंटर, लॅमिनेटर मशीन, कागद आणि इतर साहित्य जप्त केले आहे.

fake-currency

राजकोट : सोशल मीडियावर पाहिलेल्या व्हिडिओमधून कल्पना घेऊन घरातच बनावट नोटा छापल्याचा धक्कादायक प्रकार गुजरातमधील राजकोट येथे समोर आला आहे. भाजीपाला विक्री करणाऱ्या एका व्यक्तीने 100 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटा तयार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी राजकोट गुन्हे शाखेने संबंधित व्यक्तीला अटक केली असून त्याच्या घरातून नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

इन्स्टाग्राम रीलमधून सुचली कल्पना

पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आरोपीने इन्स्टाग्रामवर रील पाहताना बनावट नोटा तयार करण्याची कल्पना सुचल्याचे सांगितले. त्यानंतर टेलिग्रामवर एका व्यक्तीशी संपर्क साधून बनावट नोटा तयार करण्यासंदर्भातील माहिती मिळवल्याचेही त्याने सांगितल्याची माहिती आहे.

यानंतर त्याने आपल्या घरातच 100 आणि 500 रुपयांच्या नोटांची नक्कल तयार करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे.

छाप्यात प्रिंटर, लॅमिनेटर आणि कागद जप्त

राजकोट शहर गुन्हे शाखा आणि विशेष कृती गटाने आरोपीच्या घरावर छापा टाकला. या कारवाईत 100 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटांसह प्रिंटिंगसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले.

पोलिसांनी एक CPU, मॉनिटर, दोन प्रिंटर, लॅमिनेटर हीटर मशीन, बटर पेपर तसेच नोटांच्या छपाईसाठी वापरला जाणारा कागद ताब्यात घेतला. जप्त करण्यात आलेल्या साहित्याची किंमत सुमारे 65 हजार 500 रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.

कर्जामुळे बनावट नोटा छापल्याची कबुली

प्राथमिक चौकशीत आरोपीने आपण भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत असून उत्पन्न कमी असल्याने कर्जाचा बोजा वाढला होता, असे सांगितले. आर्थिक अडचणींमुळे बनावट नोटा तयार करण्याचा मार्ग स्वीकारल्याचे त्याने पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे.

बनावट नोटा बाजारात गेल्याचा पोलिसांना संशय

आरोपीने तयार केलेल्या काही बनावट नोटा बाजारात वापरण्यात आल्या आहेत का, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. विशेषतः छोट्या व्यवहारांमध्ये अशा नोटा वापरण्यात आल्या असण्याची शक्यता तपासली जात आहे.

संशयास्पद नोट आढळल्यास ती पुढे व्यवहारात न वापरता संबंधित बँक किंवा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Inline Article Ad 728x90