हेमंत बागुल यांची युवासेना पुणे महानगर अध्यक्षपदी नियुक्ती
पुणे शहरातील युवासेना अधिक मजबूत करण्यासाठी शिवसेनेने आर्किटेक्ट आणि उच्चशिक्षित हेमंत बागुल यांची युवासेना पुणे महानगर अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार झालेल्या या नियुक्तीनंतर बागुल यांनी युवकांचे संघटन, रोजगार, करिअर मार्गदर्शन आणि सामाजिक कार्याला प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे

पुणे : पुणे शहरातील युवासेना अधिक मजबूत करण्यासाठी शिवसेनेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. व्यवसायाने आर्किटेक्ट आणि उच्चशिक्षित असलेल्या हेमंत बागुल यांची युवासेना पुणे महानगर अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षण आणि आयटी क्षेत्रासाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यात एका सुशिक्षित तरुणाला ही जबाबदारी दिल्यामुळे या नियुक्तीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
ही नियुक्ती शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. युवासेनेचे राष्ट्रीय विस्तारक आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तसेच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती युवासेनेचे कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक आणि सचिव किरण साळी यांनी दिली. मुंबई येथे उद्योगमंत्री उदय सामंत आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते हेमंत बागुल यांनी नियुक्तीपत्र स्वीकारले.
नियुक्तीनंतर हेमंत बागुल यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडण्याचा विश्वास व्यक्त केला. पुण्यातील युवकांना एकत्र आणून त्यांना सामाजिक, शैक्षणिक आणि विकासाच्या कामांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सरकारच्या आणि शिवसेनेच्या विविध योजना विद्यार्थी आणि युवकांपर्यंत पोहोचविण्यासाठी काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
युवकांना रोजगार, करिअर मार्गदर्शन, कौशल्य विकास आणि सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी युवासेनेच्या माध्यमातून चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. युवकांमध्ये नेतृत्वगुण विकसित करून त्यांना समाजकार्यात सक्रिय करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
पुण्यात मोठ्या संख्येने तरुण मतदार असल्याने आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. हेमंत बागुल यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक अनुभवाचा युवासेनेच्या संघटन वाढीस फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.