हिंगोलीत ‘स्कूल ठीक करो’ अभियान; फुटक्या खिडकीवर शिंदेंचा बॅनर, पोषण आहारावर सवाल

हिंगोलीतील संतुक पिंपरीत अभिजीत दिपकेंनी ‘स्कूल ठीक करो’ अभियान सुरू केले. ZP शाळेतील फुटक्या खिडक्या, अस्वच्छ शौचालये आणि पोषण आहारातील कथित तफावत समोर आली. विद्यार्थी व पालकांच्या समस्या नोंदवून त्यांचा डेटा संकलित केला जाणार आहे.

Abhijeet-Dipke-inspects-his-village

हिंगोली : गावखेड्यातील शाळांच्या समस्या आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांचा आढावा घेण्यासाठी कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी ‘स्कूल ठीक करो’ अभियानाला सुरुवात केली. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने त्यांच्या मूळ गावातील संतुक पिंपरी येथून या अभियानाची सुरुवात करण्यात आली.

अभिजीत दिपके यांनी संतुक पिंपरी येथील ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थिती लावल्यानंतर जिल्हा परिषद शाळेची पाहणी केली. शाळेतील वर्गखोल्यांची पाहणी करताना काही खिडक्या फुटलेल्या असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यातील एका फुटलेल्या खिडकीला झाकण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा फोटो असलेला बॅनर लावण्यात आल्याचे दिसून आले. यानंतर शाळेतील स्वच्छतागृहांचीही पाहणी करण्यात आली. शौचालय आणि मुतारी परिसरात दुर्गंधी तसेच अस्वच्छता असल्याचे आढळल्याचा दावा करण्यात आला. शाळेतील विविध अडचणींबाबत दिपके यांनी विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधून त्यांच्याकडून समस्या जाणून घेतल्या.

पोषण आहाराच्या नोंदीवरून प्रश्न

शाळकरी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पोषण आहाराची व्यवस्थाही दिपके यांनी तपासली. यावेळी शाळेतील पोषण आहाराचे रजिस्टर तपासण्यात आले. रजिस्टरमध्ये नमूद केलेला मेन्यू आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात मिळणारा आहार यामध्ये तफावत असल्याचे विद्यार्थ्यांशी चर्चेतून समोर आल्याचा दावा करण्यात आला.

अभियानाच्या माध्यमातून शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा, त्यातील त्रुटी आणि आवश्यक सुधारणा यांची माहिती संकलित करण्यासाठी एक विशेष फॉर्म तयार करण्यात आला आहे. दिपके यांनी संतुक पिंपरी येथील शाळेची पाहणी करताना हा फॉर्म भरला. देशभरातील विविध शाळांना भेटी देऊन अशाच प्रकारे माहिती आणि समस्या संकलित करण्याचा CJPचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, शाळेतील समस्यांबाबत संतुक पिंपरीच्या सरपंचांशीही चर्चा करण्यात आली. गावातील शाळेच्या अडचणी आगामी काळात सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन सरपंचांकडून देण्यात आल्याची माहिती आहे.

यानंतर अभिजीत दिपके यांनी लिंबाळा परिसरातील अपंग निवासी विद्यालयालाही भेट दिली. तेथे विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि आवश्यक सुविधांबाबत माहिती घेतली. ‘स्कूल ठीक करो’ अभियानाच्या माध्यमातून देशभरातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील शाळांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांच्या समस्या प्रशासनासमोर मांडण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे CJPकडून सांगण्यात आले आहे.


Inline Article Ad 728x90