"माझ्या मुलाला जातीवरून छळलं, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली"; साहिल वाकोडेच्या वडिलांचा गंभीर आरोप, IIT संचालकांसह प्राध्यापकांच्या अटकेची मागणी!

आयआयटी बॉम्बेतील विद्यार्थी साहिल वाकोडेच्या मृत्यूप्रकरणात वडील रवींद्र वाकोडे यांनी गंभीर आरोप करत प्रा. सूर्यनारायण डुल्ला आणि संचालक शिरीष केदारे यांच्या अटकेची मागणी केली आहे. साहिलला गेल्या तीन महिन्यांपासून जातीवरून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाचा तपास सध्या मुंबई गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

IIT Student Suicide Case

मुंबई : आयआयटी बॉम्बेतील विद्यार्थी साहिल वाकोडेच्या आत्महत्येप्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. साहिलचे वडील रवींद्र वाकोडे यांनी पत्रकार परिषद घेत आयआयटी प्रशासन आणि संबंधित प्राध्यापकांवर गंभीर आरोप केले आहेत. आपल्या मुलाचा जातीवरून मानसिक छळ करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी प्रा. सूर्यनारायण डुल्ला आणि आयआयटीचे संचालक शिरीष केदारे यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.

'मी वरच्या जातीचा, तू खालच्या जातीचा'; वडिलांचा गंभीर आरोप

साहिलला गेल्या तीन महिन्यांपासून जातीवरून त्रास दिला जात असल्याचा आरोप रवींद्र वाकोडे यांनी केला आहे. आपल्याला वरिष्ठ जातीचा आणि साहिलला कनिष्ठ जातीचा असल्याचं सांगत त्याला डिवचलं जात होतं. तसेच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमक्याही दिल्या जात होत्या, असा दावा त्यांनी केला.

१३ सप्टेंबर रोजी साहिलला भेटण्यासाठी आलो होतो. त्यावेळी त्याची समजूत घातली होती. मात्र, त्याच्यावर होत असलेल्या अन्यायाची माहिती त्याने आपल्याला दिली होती, असंही रवींद्र वाकोडे यांनी सांगितलं.

'कॉपी केली असेल तर सीसीटीव्ही फुटेज दाखवा'

साहिलने परीक्षेत कॉपी केल्याच्या आरोपावरही त्याच्या वडिलांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. साहिल हुशार विद्यार्थी होता. त्याने परीक्षेत गैरप्रकार केला असेल, तर प्रशासनाने त्यासंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून द्यावं आणि आरोप सिद्ध करावेत, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, १८ सप्टेंबर रोजीच्या परीक्षेदरम्यान साहिलला परीक्षा हॉलमधून बाहेर जाण्यास सांगितल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. गुन्हे शाखेकडून या फुटेजसह साहिलच्या पुढील हालचालींची तपासणी केली जात आहे.

प्राध्यापकांवर कारवाई; मात्र अटकेची मागणी कायम

विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर आयआयटी प्रशासनाने प्रा. सूर्यनारायण डुल्ला यांना प्रशासकीय व्यवहार विभागाच्या अधिष्ठातापदावरून तात्पुरतं हटवलं आहे. मात्र, ते प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. संस्थेने साहिलच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध केलेल्या सुरुवातीच्या निवेदनाबद्दलही दिलगिरी व्यक्त केली आहे.

दुसरीकडे, आयआयटी बॉम्बेने जातीआधारित भेदभावाचे आरोप फेटाळले आहेत. संस्थेच्या फॅकल्टी फोरमनेही प्रा. डुल्ला यांनी परीक्षेदरम्यान संस्थेच्या नियमानुसारच कर्तव्य बजावल्याची भूमिका मांडली आहे.

संबंधित आरोपांची सत्यता अद्याप तपासातून निश्चित झालेली नाही.


रवींद्र वाकोडे यांनी गुन्हे शाखेच्या तपासावर विश्वास व्यक्त करत संबंधितांना अटक करण्याची आणि ॲट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Inline Article Ad 728x90