‘मला माझ्या मुलासाठी न्याय हवा’; साहिलच्या मृत्यूनंतर आई भावुक, पोलिसांनी सुरू केली सखोल चौकशी
आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या मृत्यू प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. साहिलच्या आईने मुलाचा मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचा गंभीर आरोप करत न्यायाची मागणी केली आहे. पवई पोलिसांकडून कुटुंबीयांसह काही विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवले जात असून मृत्यूपूर्वी नेमक्या कोणत्या घटना घडल्या, याचा तपास सुरू आहे.

मुंबई : आयआयटी मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या मृत्यू प्रकरणात आता त्याच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. साहिलच्या आईने आपल्या मुलाचा मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचा दावा करत त्याच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. साहिलच्या मृत्यूनंतर त्याचे आई-वडील आणि इतर कुटुंबीय मुंबईत दाखल झाले असून पवई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
माध्यमांशी बोलताना साहिलची आई भावुक झाली. आपल्या मुलाचा छळ करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकरणात न्याय मिळावा, अशी मागणी केली. कुटुंबीयांकडून पवई पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
पवई पोलिसांकडून चौकशी; विद्यार्थ्यांचेही जबाब
साहिलच्या मृत्यूपूर्वी नेमक्या कोणत्या घटना घडल्या, त्याच्यावर कोणता दबाव होता आणि कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.
तपासाचा भाग म्हणून साहिलच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवण्यात येत आहेत. आयआयटी मुंबईतील काही विद्यार्थ्यांनाही चौकशीसाठी पवई पोलीस ठाण्यात बोलावण्यात आल्याची माहिती आहे.
परीक्षेदरम्यान नेमकं काय घडलं?
साहिल वाकोडे हा आयआयटी मुंबईच्या एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागात शिकत होता. मिड-सेमिस्टर परीक्षेदरम्यान मोबाइल फोन वापरल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. प्रश्नपत्रिकेशी संबंधित माहिती एआय अॅपवर अपलोड केल्याचाही आरोप समोर आला होता.
या प्रकारानंतर शिक्षक आणि विभागीय अधिकाऱ्यांनी त्याच्याशी चर्चा केली होती. त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली. मात्र या घटनेचा त्याच्या पुढील शैक्षणिक कारकिर्दीवर विपरीत परिणाम होणार नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आल्याचेही वृत्त आहे.
यानंतर शुक्रवारी सायंकाळी साहिल वसतिगृहातील खोलीत मृतावस्थेत आढळला.
मृत्यूनंतर विद्यार्थ्यांचे आंदोलन
साहिलच्या मृत्यूची माहिती समोर आल्यानंतर आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली.
काही विद्यार्थ्यांनी आगामी परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिल्याचेही सांगण्यात आले. संस्थेचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. आयआयटी प्रशासनाने साहिलच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
साहिल वाकोडे कोण होता?
साहिल वाकोडे हा महाराष्ट्रातील यवतमाळचा रहिवासी होता. त्याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याची आई शाळेत शिक्षिका असून वडील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये कार्यरत आहेत.
साहिलच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर त्याचे आई-वडील आणि काका मुंबईत दाखल झाले. कुटुंबीयांनी आता या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी केली आहे.
साहिलचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, त्यापूर्वी त्याच्यासोबत काय घडलं आणि कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांबाबत तपासात काय समोर येतं, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे.