MPSC पेपरफुटीला ‘प्रेमाचा अँगल’ देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? नंदुरबारातून ऋतुजा पाटील ताब्यात; तपासाला नवं वळण
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या विशेष गुन्हे शाखेने नंदुरबारातून ऋतुजा पाटील यांना ताब्यात घेतलं आहे. यापूर्वी तक्रारदार प्रवीण पाटील याला अटक करण्यात आली होती. मात्र, पेपरफुटीमागे केवळ प्रेमप्रकरण नसून मोठं रॅकेट असल्याचा गंभीर आरोप तक्रारदार ऋषिकेश गांगुर्डे यांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणामागचा खरा सूत्रधार कोण? याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणाने आता आणखी गंभीर वळण घेतलं आहे. मुंबई पोलिसांच्या विशेष गुन्हे शाखेच्या पथकाने नंदुरबारमधून ऋतुजा पाटील यांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्या ज्ञानदीप सोसायटीतील राहत्या घरातून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.
मुंबई पोलिसांचं पथक मंगळवारी सकाळपासून नंदुरबारमध्ये दाखल झालं होतं. शहरातील विविध ठिकाणी झाडाझडती आणि चौकशी केल्यानंतर पोलिसांनी ऋतुजा पाटील यांना ताब्यात घेतलं. त्यांना पुढील तपासासाठी मुंबईला नेण्यात येणार असल्याचं समजतं.
प्रकरणाला ‘प्रेमाचा अँगल’, पण तक्रारदाराचा दावा वेगळाच!
या पेपरफुटी प्रकरणात सुरुवातीपासूनच प्रेमप्रकरणाचा अँगल समोर आला होता. तक्रारदार गौरव पाटील आणि ऋतुजा पाटील यांच्या कथित प्रेमसंबंधातून पेपर फुटल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, दुसरे तक्रारदार ऋषिकेश गांगुर्डे यांनी हा दावा फेटाळत प्रेमाचा अँगल दाखवून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे.
विशेष म्हणजे, पेपरफुटीची तक्रार करणाऱ्या गौरव पाटील यांनाच पोलिसांनी अटक केल्याचा दावा गांगुर्डे यांनी केला आहे. त्यानंतर आता ऋतुजा पाटील यांना ताब्यात घेण्यात आल्याने या प्रकरणातील तपासाला नवं वळण मिळालं आहे.
‘पेपर मास लेव्हलवर फुटला’, गांगुर्डेंचा गंभीर आरोप
ऋषिकेश गांगुर्डे यांनी या प्रकरणात पेपर मोठ्या प्रमाणावर लीक झाल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, पेपरफुटीमागे केवळ प्रेमप्रकरण नसून मोठं नेटवर्क असू शकतं.
गांगुर्डे यांच्या आरोपानुसार, एका अधिकाऱ्याने आपल्या नातेवाईकासाठी पेपर मिळवला आणि त्यानंतर तो मोठ्या रकमेत विकला गेला. पुढे हा पेपर अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचा त्यांचा दावा आहे. या प्रकरणाची व्याप्ती सातारा, बीड आणि सोलापूरपर्यंत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
मात्र, हे सर्व आरोप असून त्याची स्वतंत्र पुष्टी अद्याप झालेली नाही. पोलिसांच्या तपासातूनच या दाव्यांमागील तथ्य स्पष्ट होणार आहे.
MPSC अधिकाऱ्यांसह सहा जणांना यापूर्वी अटक
औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी MPSC मार्फत घेण्यात आलेली संपूर्ण भरती प्रक्रिया पेपरफुटीच्या आरोपांनंतर रद्द करण्यात आली आहे. या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने यापूर्वीच MPSCच्या तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक केली आहे.
यामध्ये MPSCचे अप्पर सचिव अभिजीत लेंडवे यांचाही समावेश आहे. यापूर्वी प्रवीण पाटील यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
आता ऋतुजा पाटील यांना ताब्यात घेतल्यानंतर तपासाची दिशा आणखी स्पष्ट होण्याची शक्यता आहे. खरंच या प्रकरणामागे प्रेमप्रकरण होतं, की त्यामागे पेपरफुटीचं मोठं रॅकेट दडलं आहे? आणि या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाईंड नेमका कोण? या प्रश्नांची उत्तरं पोलिसांच्या पुढील तपासातून समोर येणार आहेत.