लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आला अन् रांगेतच बिघडली प्रकृती; 25 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मित्रांसोबत आलेल्या जळगावच्या 25 वर्षीय तरुणाची अचानक प्रकृती बिघडली. रांगेतून बाहेर पडल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

मुंबई : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आलेल्या जळगावच्या 25 वर्षीय तरुणासोबत दुर्दैवी घटना घडली आहे. मित्रांसोबत दर्शनाच्या रांगेत उभा असताना अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले. काही वेळातच प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
मृत तरुणाचे नाव जयदीप मेघराज नेमाडे (वय 25) असे आहे. ही घटना 17 सप्टेंबर रोजी रात्री सुमारे 11.40 वाजता घडली.
रांगेत उभा असताना अचानक काय घडलं?
दरवर्षीप्रमाणे यंदाही जयदीप मित्रांसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आला होता. रात्री दर्शनासाठी तो रांगेत उभा असताना अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले. गुदमरल्यासारखा त्रास होत असल्याचे त्याने मित्रांना सांगितले आणि तो रांगेतून बाहेर पडला.
मात्र, काही वेळातच त्याची प्रकृती अधिक खालावली. परिसरात उपस्थित पोलिसांनी तातडीने मदत करत त्याला मदत कक्षात नेले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून त्याला रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार, हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पुण्यात करत होता नोकरी
जयदीप हा जळगाव येथील नेमाडे ट्रान्सपोर्टचे संचालक मेघराज सुभाष नेमाडे यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर MBA केले होते. शिक्षणानंतर तो पुण्यात नोकरी करत होता.
गणेशोत्सवाच्या काळात मित्रांसोबत मुंबईत येऊन लालबागच्या राजाचे दर्शन घेण्याची त्याची दरवर्षीची परंपरा होती. यंदाही तो त्याच उद्देशाने मुंबईला आला होता; मात्र दर्शनाआधीच घडलेल्या या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला.
एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर
जयदीपच्या आईचे सुमारे 12 वर्षांपूर्वी निधन झाले होते. तो कुटुंबाचा एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या अचानक मृत्यूमुळे नेमाडे कुटुंबासह नातेवाईक आणि मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे.
शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जयदीपचा मृतदेह जळगाव येथे नेण्यात आला. शनिवारी सकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.