कोंढव्यात ‘सुफी पान टपरी’वर छापा; ई-सिगारेट विक्रीप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

ढवा परिसरातील पारगेनगर येथील ‘सुफी पान टपरी’वर बेकायदेशीरपणे ई-सिगारेट (वेप) आणि वैधानिक इशारा नसलेल्या तंबाखूजन्य सिगारेटची विक्री केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत रेहान अरीफ पठाण (वय २२) याला ताब्यात घेऊन ₹४५,१८० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरोधात इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंधक कायदा २०१९ आणि COTPA कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, अवैध तंबाखूजन्य उत्पादनांच्या विक्रीविरोधात पोलिसांची कारवाई सुरू राहणार आहे.

कोंढव्यात  ई-सिगारेट Image

पुणे: कोंढवा परिसरातील पानटपरीवर बेकायदेशीरपणे ई-सिगारेट (वेप) तसेच वैधानिक इशारा नसलेल्या तंबाखूजन्य सिगारेटची विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर कोंढवा पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ₹४५,१८० किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, संबंधित विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाकडून परिसरातील अवैध व्यवसायांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पेट्रोलिंग करण्यात येत होते. यावेळी पारगेनगर, कोंढवा खुर्द येथील ‘सुफी पान टपरी’ येथे ई-सिगारेट (वेप) आणि नियमबाह्य तंबाखूजन्य सिगारेटची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी माहितीची खातरजमा करून संबंधित पानटपरीवर छापा टाकला. या कारवाईत रेहान अरीफ पठाण (वय २२, रा. युनिटी पार्क, कोंढवा खुर्द) याला ताब्यात घेण्यात आले.

पानटपरीची झडती घेतली असता एका कापडी बॅगेमध्ये ELFBAR कंपनीच्या विविध फ्लेवरच्या ई-सिगारेट (वेप) तसेच वैधानिक इशारा नसलेल्या तंबाखूजन्य सिगारेटचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी हा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला असून, त्याची एकूण किंमत ₹४५,१८० इतकी आहे.

या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५६०/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरोधात इलेक्ट्रॉनिक सिगारेट (उत्पादन, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, साठवणूक व जाहिरात प्रतिबंध) अधिनियम, २०१९ तसेच सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने (COTPA) कायदा, २००३ अंतर्गत संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस उपआयुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक पोलीस आयुक्त रामदास इंगवले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रशांत मंडले यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने केली.

दरम्यान, बेकायदेशीर ई-सिगारेट, वेप आणि तंबाखूजन्य उत्पादनांच्या विक्रीविरोधात पोलिसांकडून कठोर कारवाई सुरू असून, भविष्यातही अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


Inline Article Ad 728x90