लालबागच्या राजाच्या चरणी 12 दिवसांत 6.11 कोटींचे दान; 1 किलो सोन्याची वीट ठरली आकर्षण

यंदाच्या गणेशोत्सवात लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांनी भरभरून दान अर्पण केले. अवघ्या 12 दिवसांत तब्बल 6 कोटी 11 लाख 96 हजार 500 रुपयांचे दान जमा झाले आहे. यामध्ये रोकड, सोन्या-चांदीचे दागिने आणि विविध मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे, एका अज्ञात भाविकाने 24 कॅरेटची तब्बल एक किलो वजनाची सोन्याची वीट अर्पण केली असून तिची किंमत सुमारे 1 कोटी 48 लाख रुपये आहे.

lalbaughcha-raja-donation-money-gold-silver

मुंबई : यंदाही गणेशोत्सवात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मनोकामना पूर्ण व्हाव्यात तसेच मागील वर्षी केलेल्या नवसाची पूर्तता झाल्याबद्दल अनेक भाविकांनी लालबागच्या राजाच्या चरणी रोकड, सोने, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तू अर्पण केल्या आहेत.

यंदा अवघ्या 12 दिवसांत लालबागच्या राजाच्या चरणी एकूण 6 कोटी 11 लाख 96 हजार 500 रुपयांचे दान जमा झाले आहे. या दानामध्ये रोकडेसह सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू आणि इतर मौल्यवान भेटवस्तूंचा समावेश आहे.

1 किलो सोन्याची वीट अर्पण

यंदाच्या दानातील सर्वाधिक लक्षवेधी वस्तू म्हणजे एका अज्ञात भाविकाने अर्पण केलेली एक किलो वजनाची 24 कॅरेट सोन्याची वीट. या सोन्याच्या विटेची किंमत सुमारे 1 कोटी 48 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

याशिवाय एका अन्य अज्ञात भाविकाने 18 कॅरेट सोन्याची गणेशमूर्ती अर्पण केली आहे. या मूर्तीचे वजन 141 ग्रॅम असून तिची अंदाजे किंमत 15 लाख 65 हजार रुपये आहे.

सोने-चांदीच्या वस्तूंचा लिलाव

लालबागच्या राजाच्या चरणी गणेशोत्सव काळात अर्पण करण्यात आलेल्या सोने, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूंचा लिलाव करण्यात येत आहे. सोन्याचे दागिने, सोन्याचे मोदक, चांदीच्या गदा, क्रिकेटच्या बॅट तसेच दोन मोटारसायकली या लिलावातील प्रमुख आकर्षण ठरत आहेत.

दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांनी आपल्या श्रद्धेनुसार आणि नवसपूर्तीनिमित्त मोठ्या प्रमाणावर दान अर्पण केले आहे.

कोणत्या पेटीत किती दान?

लालबागच्या राजाच्या चरणी 12 दिवसांत एकूण 6 कोटी 11 लाख 96 हजार 500 रुपयांचे दान जमा झाले. यापैकी स्टेज पेटीत सुमारे 3 कोटी 53 लाख रुपये जमा झाले. तरंग पेटीत जवळपास 2 कोटी 42 लाख रुपयांचे दान आले. तसेच विसर्जन पेटीत 16 लाख 14 हजार रुपयांचे दान जमा झाले आहे.

Inline Article Ad 728x90