लोणावळा शहर पोलिसांची मोठी कामगिरी; २.२१ लाखांचा चोरीचा मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत
लोणावळा शहर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण, Google Pay व्यवहार आणि गुप्त माहितीच्या आधारे चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी छडा लावत २ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी हरिदास बाळू कोळेकर याला मुंबईतील मानपाडा (कल्याण) येथून अटक करण्यात आली. आरोपीकडून एचपी लॅपटॉप, ॲपलचे दोन मोबाईल, स्मार्ट वॉच, एअरपॉड्स, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली असून, न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील तपास सुरू आहे.

पुणे : लोणावळा शहर पोलिसांनी अत्याधुनिक तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि डिजिटल व्यवहारांच्या आधारे चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी छडा लावत मोठी कामगिरी केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेला तब्बल २ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, या प्रकरणी हरिदास बाळू कोळेकर या सराईत आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील तपास सुरू आहे.
लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५३/२०२६ भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेत घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण, Google Pay व्यवहार, गुप्त माहिती तसेच स्थानिक पातळीवरील तपासाच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीचा मोबाईल क्रमांक, पत्ता आणि इतर तांत्रिक माहिती मिळवून त्याचे सखोल विश्लेषण केले. मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपी मुंबईजवळील मानपाडा (कल्याण) परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांची परवानगी घेऊन लोणावळा शहर पोलिसांचे विशेष पथक तातडीने मानपाडा येथे रवाना झाले.
स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपी हरिदास बाळू कोळेकर याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने चोरीची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त केला. यात एचपी कंपनीचा लॅपटॉप, ॲपल कंपनीचे दोन मोबाईल फोन, ॲपल स्मार्ट वॉच, ॲपल एअरपॉड्स, रोख रक्कम तसेच गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली होंडा शाईन दुचाकी (एमएच-०३-एफजी-३३४९) जप्त करण्यात आली.
या कारवाईत एकूण २ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, चोरीचा गुन्हा पूर्णपणे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाच्या आदेशानुसार त्याचा पुढील तपास सुरू आहे. या गुन्ह्यात आरोपीचा यापूर्वीही सहभाग आहे का, तसेच त्याने इतर ठिकाणी अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचाही तपास पोलीस करत आहेत.
ही उल्लेखनीय कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली या कारवाईचे नियोजन करण्यात आले.
या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक देवरे, पोलीस हवालदार संदीप मानकर, पोलीस शिपाई नागेश कमठणकर तसेच होमगार्ड अक्षय कोकाटे यांनी विशेष परिश्रम घेत आरोपीचा शोध घेऊन चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या यशस्वी कारवाईबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास पथकाचे कौतुक केले असून, तांत्रिक तपासाच्या साहाय्याने गुन्हे उघडकीस आणण्याच्या पोलिसांच्या क्षमतेचे हे आणखी एक उदाहरण ठरले आहे.