महाराष्ट्रात सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’चा दर्जा; आता प्रत्येक घटनेची नोंद बंधनकारक, ASV साठ्यावरही सरकारची नजर

महाराष्ट्रात सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे शासकीय-खासगी रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये आणि डॉक्टरांना सर्पदंशाच्या प्रत्येक संशयित, संभाव्य किंवा निश्चित रुग्णाची तसेच मृत्यूची माहिती आरोग्य विभागाकडे नोंदवणे बंधनकारक होणार आहे. या निर्णयामुळे उपचारासाठी लागणाऱ्या एएसव्ही (ASV) साठ्याचे नियोजन आणि सर्पदंशाच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.

Snake Bite

Ai Generated

मुंबई : महाराष्ट्रात सर्पदंशामुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात आल्याने राज्यातील आरोग्य संस्थांना प्रत्येक प्रकरणाची माहिती संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांकडे देणे आवश्यक राहणार आहे.

रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा जिल्हा शल्यचिकित्सकांकडे पाठवली जाईल. ही माहिती HMIS/DHIS-2 किंवा IDSP प्रणालीद्वारे डिजिटल पद्धतीने नोंदवली जाणार आहे.

उपचारापासून ASV साठ्यापर्यंत प्रत्येक माहितीवर लक्ष

सर्पदंशाच्या रुग्णाला किती एएसव्ही (ASV) कुप्या देण्यात आल्या, उपचाराचा परिणाम काय झाला आणि रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले का, याचीही नोंद केली जाणार आहे.

या माहितीच्या आधारे कोणत्या भागात सर्पदंशाच्या घटना अधिक आहेत, याचा अंदाज घेता येणार आहे. त्यानुसार संबंधित भागात एएसव्हीचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले जाणार आहे.

राज्यापासून जिल्ह्यापर्यंत नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

सर्पदंश प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणाही तयार करण्यात आली आहे. राज्यस्तरावर संचालक (रुग्णालये), जिल्हास्तरावर जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी, तर महानगरपालिका क्षेत्रात वैद्यकीय आरोग्य अधिकारी नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

हे अधिकारी सर्पदंशाच्या घटना, उपचार सुविधा आणि एएसव्ही उपलब्धतेवर देखरेख ठेवणार आहेत.

आकडेवारीच्या आधारे जनजागृती मोहीम

सर्पदंशाच्या घटनांचे ठिकाण, हंगाम आणि इतर कारणांचा अभ्यास करून त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्या जाणार आहेत. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये जनजागृतीवर भर दिला जाणार आहे.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी वेळेत उपचार मिळणे हा सर्पदंशाच्या रुग्णाचा जीव वाचवण्याचा महत्त्वाचा मार्ग असल्याचे सांगितले आहे. आता प्रत्येक घटनेची नोंद उपलब्ध झाल्याने राज्यातील सर्पदंशाच्या संकटाचे नेमके चित्र समोर येण्यास आणि त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यास मदत होणार आहे.

Inline Article Ad 728x90