'आमने सामने'च्या वादात महेश मांजरेकर स्पष्टच बोलले! रोहन गुजर-केतकी पालव यांची बाजू घेत निर्मात्यांना सुनावलं
मराठी रंगभूमीवरील चर्चेत असलेल्या 'आमने सामने' नाटकाचा वाद आता अधिकच चिघळला आहे. रोहन गुजर आणि केतकी पालव यांना नाटकातून काढल्याच्या आरोपांवर दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही कलाकारांना अशा प्रकारे नाटकातून काढणं अन्यायकारक असल्याचं म्हणत त्यांनी निर्माते लीना भागवत आणि मंगेश कदम यांना कलाकारांशी चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे.

मुंबई : मराठी रंगभूमीवर सध्या 'आमने सामने' या नाटकाची जोरदार चर्चा सुरू आहे. नाटकातील कलाकार रोहन गुजर आणि केतकी पालव यांना कोणतीही पूर्वसूचना किंवा औपचारिक निरोप न देता नाटकातून काढण्यात आल्याचा आरोप दोघांनी केला होता. या आरोपानंतर नाटकाचे निर्माते आणि कलाकार लीना भागवत तसेच मंगेश कदम यांनी आपली बाजू मांडली. दोन्ही कलाकारांनी तिसऱ्यांदा मानधनवाढीची मागणी केल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आता या संपूर्ण प्रकरणावर ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी प्रतिक्रिया दिली असून, कलाकारांना अशा पद्धतीने काढणं चुकीचं असल्याचं मत व्यक्त केलं आहे.
काय आहे 'आमने सामने' नाटकाचा वाद?
'आमने सामने' या नाटकातील रोहन गुजर आणि केतकी पालव यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत आपल्याला नाटकातून काढण्यात आल्याचा आरोप केला होता. कोणतीही औपचारिक चर्चा किंवा निरोप न देता अचानक नाटकातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं दोन्ही कलाकारांनी म्हटलं होतं.
यानंतर नाटकाचे निर्माते लीना भागवत आणि मंगेश कदम यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं. रोहन आणि केतकी यांनी वारंवार मानधनवाढीची मागणी केली होती. तिसऱ्यांदा मानधन वाढवण्याची मागणी झाल्यानंतर ती व्यावसायिकदृष्ट्या परवडणारी नसल्याने हा निर्णय घ्यावा लागल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे या प्रकरणावरून मराठी नाट्यसृष्टीत दोन गट पडल्याचं चित्र पाहायला मिळालं.
महेश मांजरेकर म्हणाले, 'त्यांना असं काढणं अन्यायकारक!'
या संपूर्ण वादावर महेश मांजरेकर यांनी नुकत्याच दिलेल्या न्यूज 18 मराठीच्या मुलाखतीत आपलं मत मांडलं. ते म्हणाले, "मी दोन्ही व्हिडीओ पाहिले. It was very unfair, त्यांना असं काढणं. सात वर्ष ते एकत्र होते. आधी नाटक चालत नव्हतं, मग त्यांनी ते बंद केलं. पुन्हा सुरू केलं. त्यानंतर कोविड आला. आधी वेगळे निर्माते होते. मग यांनी ठरवलं की आपणच करूयात. पण सात वर्ष ते दोघे तुमच्यासोबत होते ना? एवढ्या चढ-उतारांमध्ये त्यांनी तुमची साथ दिली."
पुढे मानधनवाढीच्या मागणीबाबत बोलताना मांजरेकर म्हणाले की, कलाकारांनी नेमकी किती मानधनवाढ मागितली होती, याची आपल्याला कल्पना नाही. मात्र, नाटकाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असताना कलाकारांशी चर्चा करून प्रश्न सोडवता आला असता, असं त्यांना वाटतं.
'त्यांना बसवून चर्चा करता आली असती!'
महेश मांजरेकर पुढे म्हणाले, "मला माहित नाही की त्या कलाकारांनी किती मानधनवाढ मागितली. पण नाटकाला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. बरं, या नाटकात चारच कॅरेक्टर आहेत. तुम्ही त्यांना बसवून सांगू शकला असता की आमच्याकडून शक्य होणार नाही. तुम्हाला जर एवढ्या मानधनात जमणार नसेल, तर आम्ही दुसरा बघू. तुम्हाला परवडत नसेल तर... पण हे तातडीने त्यांना सांगणं की उद्यापासून करू नका, हे कुठेतरी खटकलं."
कलाकारांनी सात वर्षे नाटकाला साथ दिली, त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधून निर्णय घेणं अधिक योग्य ठरलं असतं, असंही त्यांनी नमूद केलं.
लीना भागवत आणि मंगेश कदम यांच्याबद्दलही केलं भाष्य
या वादात त्यांनी केवळ रोहन गुजर आणि केतकी पालव यांची बाजू घेतली असं नाही, तर लीना भागवत आणि मंगेश कदम यांच्याबद्दलही आपुलकी व्यक्त केली. मंगेश आपला मित्र असल्याचं सांगत लीनाच्या अभिनयाचंही त्यांनी कौतुक केलं.
"मंगेश आणि लीना खूप चांगली आहेत. मंगेश मित्र आहे आणि लीनाच्या अभिनयाचं मी कौतुक करत आलो आहे. या दोघांनीही त्यांना चांगली साथ दिली. चौघांचं चांगलं जमलं होतं. मला असं वाटतं की दोघांनी बसावं, चर्चा करावी," असं मत महेश मांजरेकर यांनी व्यक्त केलं.
एकंदरीत, 'आमने सामने' नाटकाच्या वादावर महेश मांजरेकर यांनी दोन्ही बाजूंचा आदर राखत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मानधनवाढीचा मुद्दा असला तरी सात वर्षांची साथ आणि कलाकारांमधील नातं लक्षात घेऊन संवादातून मार्ग काढायला हवा होता, असं त्यांचं म्हणणं आहे. आता या वादावर दोन्ही बाजू एकत्र येऊन तोडगा काढणार का, याकडे मराठी नाट्यरसिकांचं लक्ष लागलं आहे.