मीराबाई चानूचा ऐतिहासिक पराक्रम! तब्बल २८ वर्षांनंतर भारताच्या खात्यात वेटलिफ्टिंगचं पदक
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताच्या मीराबाई चानूने ऐतिहासिक कामगिरी करत वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक पटकावलं. स्नॅचमध्ये ८७ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १११ किलो असं एकूण १९८ किलो वजन उचलत तिने भारताची २८ वर्षांची पदकाची प्रतीक्षा संपवली. हे तिच्या कारकिर्दीतील पहिलं आशियाई क्रीडा स्पर्धेचं पदक ठरलं.

Asian Games 2026: जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूने महिलांच्या ४९ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावत इतिहास रचला आहे. तब्बल २८ वर्षांनंतर भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेतील वेटलिफ्टिंगमध्ये पदक मिळालं आहे.
नागोया, जपान : भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. महिलांच्या ४९ किलो वजनी गटात तिने एकूण १९८ किलो वजन उचलत रौप्यपदक पटकावलं. स्नॅचमध्ये ८७ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १११ किलो वजन उचलत तिने दुसरं स्थान मिळवलं. उत्तर कोरियाच्या रि सोंग गमने एकूण २१५ किलो वजन उचलत सुवर्णपदकावर नाव कोरलं.
स्नॅचमध्ये ८७ किलो, क्लीन अँड जर्कमध्ये १११ किलो
मीराबाईने स्नॅच प्रकारात पहिल्या प्रयत्नात ८३ किलो, दुसऱ्या प्रयत्नात ८५ किलो आणि तिसऱ्या प्रयत्नात ८७ किलो वजन यशस्वीरीत्या उचललं. या फेरीनंतर ती तिसऱ्या स्थानावर होती. त्यानंतर क्लीन अँड जर्क प्रकारात तिने १११ किलो वजन उचलत रौप्यपदक निश्चित केलं.
उत्तर कोरियाच्या रि सोंग गमने स्नॅचमध्ये ९४ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १२१ किलो वजन उचलत एकूण २१५ किलोची कामगिरी केली. इंडोनेशियाच्या लुलुक डायनी त्रि विजयानाने कांस्यपदक पटकावलं.
२८ वर्षांनंतर भारताची प्रतीक्षा संपली
आशियाई क्रीडा स्पर्धेतील वेटलिफ्टिंगमध्ये भारताला यापूर्वी १९९८ मध्ये पदक मिळालं होतं. बँकॉक येथे झालेल्या स्पर्धेत कर्णम मल्लेश्वरीने महिलांच्या ६३ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकलं होतं. त्यानंतर भारताला या खेळात पदक मिळवण्यासाठी तब्बल २८ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. आता मीराबाई चानूने ही प्रतीक्षा संपवली आहे.
मीराबाईच्या कारकिर्दीतील पहिलं आशियाई पदक
टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावणाऱ्या मीराबाई चानूने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही सुवर्णपदक मिळवलं आहे. यंदाच्या ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलं होतं. मात्र, आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक तिच्या खात्यात नव्हतं. २०२३ मधील हांगझोऊ स्पर्धेत चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलेल्या मीराबाईने यंदा रौप्यपदक पटकावत आपल्या कारकिर्दीतील ही उणीव भरून काढली.
भारताच्या पदकसंख्येत भर
मीराबाईच्या रौप्यपदकामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या पदकसंख्येत आणखी भर पडली आहे. २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी उपलब्ध झालेल्या पदकतालिकेनुसार भारताने एक सुवर्ण, पाच रौप्य आणि सहा कांस्य अशी एकूण १२ पदकं पटकावली आहेत. भारतीय महिला क्रिकेट संघाने देशाला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. स्पर्धा सुरू असल्याने पदकसंख्येत बदल होत आहेत.