'रेलिंग तोडलं, BMW हवेतून 75 फूट खाली; मदतीला गेले अन् समोरचं दृश्य पाहून हादरले'

मुंबईतील कोस्टल रोडवर रविवारी पहाटे भरधाव BMW कारचा भीषण अपघात झाला. कार पुलाचे रेलिंग तोडून सुमारे 75 फूट खाली कोसळल्याने तीन तरुणांचा मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी झाला. अपघातानंतर घटनास्थळी दिसलेलं दृश्य प्रत्यक्षदर्शींच्याही अंगावर काटा आणणारं होतं.

mumbai-coastal-road-accident

मुंबई : मुंबईतील कोस्टल रोड मार्गावर रविवारी पहाटे एका BMW कारचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत शनय गज्जल (वय 21), आदित्य जकासनिया (वय 19) आणि धैर्य सेठ (वय 17) या तीन तरुणांचा मृत्यू झाला, तर आदित्य ओसवाल हा गंभीर जखमी झाला आहे.

अपघाताच्या वेळी शनय गज्जल हा कार चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. कारचा वेग ताशी 100 किलोमीटरपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्यानंतर BMW कोस्टल रोडवरील पुलाचे रेलिंग तोडून सुमारे 75 फूट खाली कोसळली. पहाटे साडेपाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

75 फूट खाली कोसळल्यानंतर कारचा चेंदामेंदा

BMW खाली आदळल्याने कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर मदतीसाठी घटनास्थळी पोहोचलेल्या नागरिकांसमोर अत्यंत भीषण दृश्य होते.

कार चालवणाऱ्या शनय गज्जलचा घटनास्थळीच मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचा मृतदेह कारमध्ये अडकला होता. कारच्या तुटलेल्या भागातून त्याच्या शरीराचा काही भाग बाहेर आला होता.

ही BMW कार शनयचे वडील फाल्गून गज्जल यांच्या नावावर असल्याचे सांगण्यात येत आहे.

एअरबॅगमुळे आदित्य ओसवालचा जीव वाचला

अपघातावेळी आदित्य ओसवाल हा चालकाच्या शेजारच्या सीटवर बसला होता. दुर्घटनेत तो गंभीर जखमी झाला. कारमधील एअरबॅग उघडल्यामुळे त्याचा जीव वाचल्याचे सांगण्यात येत आहे.

त्याच्या बरगड्यांना तसेच नाक आणि जबड्याला गंभीर दुखापत झाली असून शरीरावरही अनेक जखमा आहेत. त्याला उपचारासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एक मृतदेह सनरुफमधून बाहेर फेकला गेला

कारच्या मागच्या सीटवर धैर्य सेठ आणि आदित्य जकासनिया बसले होते. कार पुलावरून खाली कोसळताना झालेल्या प्रचंड धक्क्यामुळे एक मृतदेह सनरुफमधून बाहेर फेकला गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

हा मृतदेह दुर्घटनाग्रस्त कारपासून काही अंतरावर आढळला. तर दुसरा प्रवासी मागील सीट आणि चालकाच्या सीटदरम्यान अडकला होता.

अत्यंत वेगात असलेली कार पुलाचे रेलिंग तोडून थेट खाली कोसळल्याने या दुर्घटनेची तीव्रता किती मोठी होती, हे कारच्या झालेल्या अवस्थेवरून स्पष्ट होत होते.

Inline Article Ad 728x90