फ्रीजमधील बर्फावर रक्ताचे डाग, किचनमध्ये झुरळांचा वावर; मुंबईतील प्रसिद्ध रेस्टॉरंटचा परवाना निलंबित!
मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स परिसरातील प्रसिद्ध रेस्टॉरंटवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान फ्रीजमधील बर्फावर रक्ताचे डाग, स्वयंपाकघरात झुरळे, मुंग्या आणि अस्वच्छता आढळल्याने रेस्टॉरंटचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. मुंबईतील इतर खाद्य व्यवसायांवरही एफडीएने कारवाई केली आहे.
मुंबई : मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स परिसरातील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटला अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठा दणका दिला आहे. स्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रेस्टॉरंटचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. तपासणीदरम्यान फ्रीजमधील बर्फावर मांसाहारी पदार्थांच्या रक्ताचे आणि केचअपचे डाग आढळले. तसेच स्वयंपाकघरात जिवंत झुरळे आणि मुंग्यांचा वावर असल्याचेही समोर आले. एफडीएच्या या कारवाईमुळे मुंबईतील खाद्य व्यवसायांच्या स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
फ्रीजमधील बर्फावर रक्ताचे डाग; तपासणीत नेमकं काय आढळलं?
एफडीएच्या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान संबंधित रेस्टॉरंटमध्ये स्वच्छतेच्या अनेक गंभीर त्रुटी आढळल्या. फाटलेल्या पॅकिंगमधील कच्चा माल, स्वयंपाकघरात साचलेला ग्रीस, खराब झालेल्या भिंती, अस्वच्छ ड्रेनेज आणि साचलेले पाणी आढळून आले. तसेच अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वैद्यकीय तपासणी आणि लसीकरणाच्या आवश्यक नोंदीही उपलब्ध नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
संबंधित रेस्टॉरंटला यापूर्वी सुधारणा करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, फेरतपासणीतही स्वच्छतेच्या त्रुटी कायम असल्याचे निदर्शनास आल्यानंतर एफडीएने परवाना निलंबित करण्याचा निर्णय घेतला.
मुंबईतील इतर खाद्य व्यवसायांवरही कारवाई
एफडीएने २२ सप्टेंबर रोजी केलेल्या कारवाईत मुंबईतील इतर खाद्य व्यवसायांवरही कारवाईचा बडगा उगारला. मालाड पूर्वेकडील एका डेअरी उत्पादन विक्री केंद्रातून सुमारे १३ लाख ५५ हजार रुपये किमतीचे २,४६४ किलोहून अधिक भेसळयुक्त आणि दिशाभूल करणारे लेबल असलेले तूप, रिफाइंड सूर्यफूल तेल आणि वनस्पती तूप जप्त करण्यात आले.
तसेच अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा परिसरात एका खाद्य व्यवसायाकडे वैध अन्न परवाना किंवा नोंदणी नसल्याचे आढळले. त्यामुळे वैध परवाना मिळेपर्यंत आणि आवश्यक त्रुटी दूर करेपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याशिवाय वांद्रे पश्चिमेकडील दोन खाद्य आस्थापनांमध्येही स्वच्छता आणि आरोग्यविषयक नियमांचे उल्लंघन आढळल्याने त्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
सुधारणा नोटीस देऊनही त्रुटी कायम
अन्नसुरक्षा आणि मानके कायद्यांतर्गत असलेल्या शेड्युल ४ मधील स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे एफडीएच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. संबंधित रेस्टॉरंटला यापूर्वी सुधारणा करण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, आवश्यक सुधारणा न झाल्याने प्रशासनाने परवाना निलंबनाची कारवाई केली.
दरम्यान, अन्नसुरक्षेसंबंधी आवश्यक अटींची पूर्तता करण्यासाठी विक्री तात्पुरती बंद ठेवत असल्याचे संबंधित रेस्टॉरंटच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.