मुंबईतील खारमध्ये भीषण अपघात; माजी खासदार सुधीर सावंतांविरोधात गुन्हा दाखल, BMC कर्मचाऱ्याचा मृत्यू

खार पश्चिम येथे 28 सप्टेंबर रोजी झालेल्या भीषण अपघाताप्रकरणी माजी खासदार आणि निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्याविरोधात खार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या कारने दुचाकीला धडक दिल्याने 41 वर्षीय BMC कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नीसह आणखी एक दुचाकीस्वार जखमी झाला. अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद झाला आहे.

FormarMP Sudhir_Sawant Case

मुंबई : खार पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघाताप्रकरणी माजी खासदार आणि निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्याविरोधात खार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 28 सप्टेंबरच्या सायंकाळी झालेल्या या अपघातात एका BMC कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नीसह आणखी एक दुचाकीस्वार जखमी झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खार पश्चिममधील सी.डी. रोड आणि 16 वा रोड जंक्शन परिसरात हा अपघात झाला. सुधीर सावंत यांच्या एर्टिंगा कारने पुढे जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या दुचाकीवर BMC कर्मचारी अय्यप्पन सेल्वराज हरिजन (41) आणि त्यांची पत्नी नॅन्सी हरिजन (37) प्रवास करत होते.

अपघातात अय्यप्पन हे कारखाली अडकले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी कार उचलून त्यांना बाहेर काढले आणि तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नॅन्सी हरिजन या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या अपघातात आणखी एका स्कूटीचालकालाही कारची धडक बसल्याचे समोर आले आहे. त्याच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे.

घटनेनंतर खार पोलिसांनी सुधीर सावंत यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 106(1) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम 187 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

अपघातानंतर रक्तदाब वाढल्यामुळे 71 वर्षीय सुधीर सावंत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांच्यावरील पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, या अपघाताचा संपूर्ण थरार परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सुधीर सावंत यांनी 1991 ते 1996 या कालावधीत काँग्रेसच्या तिकिटावर तत्कालीन राजापूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. ते भारतीय सैन्यात ब्रिगेडियर पदावरही कार्यरत होते.

Inline Article Ad 728x90