मुंबईच्या खारमध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक; पतीचा मृत्यू, पत्नी जखमी! अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद
मुंबईतील खार पश्चिम परिसरात भरधाव कारने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने ४१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी जखमी झाली. या अपघातात आणखी एका दुचाकीस्वाराच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून खार पोलिसांनी ७१ वर्षीय कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

भरधाव कारच्या धडकेत पतीचा मृत्यू; नागरिकांनी कार उचलून बाहेर काढले
मुंबई : मुंबईतील खार पश्चिम परिसरात सोमवारी (२८ सप्टेंबर) दुपारी भीषण अपघात घडला. भरधाव कारने दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दाम्पत्याला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात पतीचा मृत्यू झाला असून पत्नी जखमी झाली आहे. याच कारच्या धडकेत आणखी एक दुचाकीस्वार जखमी झाला आहे. अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून खार पोलिसांनी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नेमका अपघात कसा घडला?
पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, २८ सप्टेंबर रोजी दुपारी ४ ते ४.३० वाजण्याच्या सुमारास खार पश्चिम येथील सी. डी. रोड आणि १६ व्या रोडच्या जंक्शनवर हा अपघात घडला. इयाप्पन सेल्वराज हरीजन (४१) हे पत्नी नॅन्सी इयाप्पन हरीजन (३७) यांच्यासोबत दुचाकीवरून वांद्रेच्या दिशेने जात होते. त्यांनी हेल्मेटही परिधान केले होते.
यावेळी मागून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेमुळे नॅन्सी रस्त्यावर फेकल्या गेल्या, तर त्यांचे पती इयाप्पन कारखाली अडकले.
नागरिकांनी कार उचलून पतीला बाहेर काढले
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. कारखाली अडकलेल्या इयाप्पन यांना बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी कार उचलली. या अपघातात इयाप्पन यांच्या डोक्याला, चेहऱ्याला आणि शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्या कानाजवळून रक्तस्रावही होत होता.
जखमी इयाप्पन आणि त्यांच्या पत्नीला ऑटोरिक्षातून भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात डॉक्टरांनी इयाप्पन यांना मृत घोषित केले. नॅन्सी यांच्या हाताला दुखापत झाली आहे.
आणखी एक दुचाकीस्वार जखमी
या अपघातात संबंधित कारने आणखी एका दुचाकीस्वारालाही धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. या धडकेत त्याच्या एका हाताला फ्रॅक्चर झाले आहे. अपघाताचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
७१ वर्षीय कारचालकाविरोधात गुन्हा दाखल
नॅन्सी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कारचालकाची ओळख सुधीर सिताराम सावंत (७१) अशी झाली आहे. खार पोलिसांनी त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब), ३२४(४), २८१ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खार पोलीस करत आहेत.