वर्सोवा समुद्रकिनारी पोत्यात सापडला पुरुषाचा मृतदेह; हत्या करून समुद्रात फेकल्याचा संशय
मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनारी पोत्यात बांधलेला अंदाजे 35 ते 40 वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळला. हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह समुद्रात फेकण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय असून, वर्सोवा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई : अंधेरी पश्चिममधील वर्सोवा समुद्रकिनारी पोत्यात बांधलेला एका पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे वय अंदाजे 35 ते 40 वर्षे असून, हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात बांधून समुद्रात फेकण्यात आला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना अंधेरी पश्चिम येथील देवाची वाडी, जेपी रोड परिसरातील हिंदू स्मशानभूमीच्या मागील बाजूस असलेल्या वर्सोवा समुद्रकिनारी उघडकीस आली. सकाळच्या सुमारास समुद्रकिनारी आलेल्या नागरिकांना पाण्यातून वाहून आलेले पोते दिसले. त्यात संशयास्पद वस्तू असल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी ब्लेडच्या सहाय्याने पोते उघडले असता त्यामध्ये एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला. मृतदेह फुगलेल्या अवस्थेत असल्याने तो काही काळ पाण्यात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन कूपर रुग्णालयात पाठवला. डॉक्टरांनी तपासणीनंतर संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, त्याची ओळख निश्चित करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.
प्राथमिक तपासात अज्ञात व्यक्तीची हत्या केल्यानंतर मृतदेह पोत्यात बांधून समुद्रात फेकण्यात आला असावा आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला असावा, असा संशय पोलिसांना आहे.
याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) आणि 238 अंतर्गत अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मृत व्यक्तीची ओळख आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे.