नागपुरात भाजपची शक्तिप्रदर्शन रॅली! गडकरी-फडणवीस सहभागी; राहुल गांधींवर मुख्यमंत्र्यांचा घणाघात
नागपुरात 'लोकशाही वाचवा, अराजकता हटवा' या घोषणेखाली भाजप आणि महायुतीच्या वतीने महारॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. राहुल गांधींच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय स्तरावरून भारताची लोकशाही व्यवस्था बदलण्याचा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच संविधान, सर्वोच्च न्यायालय आणि लोकशाही संस्थांच्या मुद्द्यावरून काँग्रेसला लक्ष्य केले.

नागपूर : 'लोकशाही वाचवा, अराजकता हटवा' अशी घोषणा देत नागपुरात भाजप आणि महायुतीच्या वतीने महारॅलीचे आयोजन करण्यात आले. यशवंत स्टेडियमपासून सुरू झालेली ही पदयात्रा पंचशील चौक, राणी झाशी चौक, व्हेरायटी चौक मार्गे संविधान चौकापर्यंत काढण्यात आली. या महारॅलीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका करत गंभीर आरोप केले. राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून देशाची लोकशाही आणि संविधानाला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
राहुल गांधींच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय कट सुरू असल्याचा आरोप
महारॅळीला संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज आपण लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. राहुल गांधी आणि त्यांचे सहकारी लोकशाही व संविधानाला लक्ष्य करत आहेत. राहुल गांधींनी रस्त्यावरच्या लढाईचा इशारा दिला होता. मात्र, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे. आम्ही रस्त्यावरच्या लढाईसाठीही सक्षम आहोत, असा इशारा फडणवीस यांनी दिला.
तुम्ही जेवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर याल, त्यापेक्षा कितीतरी मोठ्या संख्येने आम्ही रस्त्यावर उतरू, ही भारताची गर्जना आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
'भारताची लोकशाही व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न'
राहुल गांधी यांच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय कट रचला जात असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला. त्यांना केवळ सत्ताबदल करायचा नसून भारताची लोकशाही व्यवस्था बदलायची आहे. लोकशाही व्यवस्था हटवून अतीडावी व्यवस्था आणण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. या आंतरराष्ट्रीय गटाचे नेतृत्व राहुल गांधी यांच्याकडे असल्याचा आरोपही त्यांनी केला.
1975 च्या आणीबाणीचा दाखला देत काँग्रेसवर निशाणा
संविधानातील मूलभूत अधिकारांचे महत्त्व स्पष्ट करताना फडणवीस यांनी 1975 मधील आणीबाणीचा उल्लेख केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागरिकांना मूलभूत अधिकार दिले; मात्र एखाद्या सरकारने हे अधिकार हिरावून घेतले तर काय होऊ शकते, याचे उदाहरण 1975 मध्ये इंदिरा गांधी सरकारने दाखवून दिले, असे मुख्यमंत्री म्हणाले.
संविधानाशी आणि सर्वोच्च न्यायालयाशी खेळ करणारी काँग्रेस असल्याची टीकाही त्यांनी केली.
राहुल गांधींच्या 'लाल संविधानावरून' फडणवीसांची टीका
राहुल गांधी एका हातात लाल रंगाचे संविधान घेऊन फिरतात, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान निळ्या रंगाचे होते. राहुल गांधींनी हे लाल संविधान कुठून आणले, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाल बावट्यापासून सावध राहण्याचा इशारा दिला होता, असा दावाही त्यांनी आपल्या भाषणात केला.
संविधानिक संस्थांना बदनाम करण्याचा आरोप
संविधानाला थेट विरोध केला तर जनतेकडून विरोध होईल, याची जाणीव असल्यामुळे काँग्रेसकडून संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांना बदनाम केले जात असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.
संविधानिक संस्थांकडून न्याय मिळत नाही, असा संदेश देऊन संविधान बदलण्याची मागणी पुढे आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही ते म्हणाले. बांगलादेश, नेपाळ आणि पाकिस्तानमधील परिस्थितीचा दाखला देत त्यांनी राहुल गांधींवर टीका केली.
मतदार यादीवरूनही राहुल गांधींना लक्ष्य
मतदार यादीतील नावांच्या मुद्द्यावरूनही मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. जिवंत मतदारांवर विश्वास नसल्यामुळे मृत व्यक्तींची नावे पुन्हा मतदार यादीत आणण्याची मागणी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. बांगलादेशी नागरिकांची नावे मतदार यादीतून हटवली जात असल्यामुळे काँग्रेसला त्रास होत असल्याचेही फडणवीस म्हणाले.
'लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो'
भारताची लोकशाही वाचवण्यासाठी भाजप आणि महायुती मैदानात उतरली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून लोकशाही व्यवस्थेला धोका निर्माण केला जात असल्याचा आरोप करत नागरिकांनी जागरूक राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
नागपुरातील या महारॅलीतून भाजपने काँग्रेसविरोधात जोरदार राजकीय भूमिका मांडली असून, राहुल गांधी आणि भाजप यांच्यातील संविधान व लोकशाहीच्या मुद्द्यावरील राजकीय संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.