'10 लाख द्या, नाहीतर गोळ्या घालू'; नागपुरातील आठ सराफा व्यापाऱ्यांना धमकीची पत्रे

नागपुरातील आठ सराफा व्यापाऱ्यांना लॉरेन्स बिष्णोई गँगच्या नावाने पोस्टाद्वारे धमकीची पत्रे पाठवण्यात आली आहेत. प्रत्येक व्यापाऱ्याकडे 10 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली असून, पैसे न दिल्यास गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी नागपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पत्रांचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे शहरातील सराफा व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Lawrence_Bishnoi

नागपूर : अभिनेता टायगर श्रॉफवर मुंबईतील जुहू परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर आता नागपुरातील सराफा व्यापाऱ्यांना लॉरेन्स बिष्णोई गँगच्या नावाने धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूर शहरातील तब्बल आठ सराफा व्यापाऱ्यांना पोस्टाद्वारे धमकीची पत्रे पाठवून प्रत्येकी 10 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. पैसे न दिल्यास गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी या पत्रांमध्ये देण्यात आली आहे. या घटनेमुळे नागपूरच्या व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.

'10 लाख रुपये द्या, नाहीतर तुमचे तुकडे करू'; धमकीच्या पत्रात नेमकं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील आठ सराफा व्यापाऱ्यांना एकाच पद्धतीने लिहिलेली धमकीची पत्रे पोस्टाद्वारे पाठवण्यात आली आहेत. या प्रत्येक पत्रात 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, तसेच '10 लाख रुपये द्या, नाहीतर तुमचे तुकडे करू', अशा शब्दांत धमकावण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, पैसे न दिल्यास अभिनेता टायगर श्रॉफप्रमाणे गोळ्या घालून ठार मारू, असाही उल्लेख पत्रात करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे या धमकीकडे पोलिसांकडून गांभीर्याने पाहिले जात आहे.

दुकानासमोर 'जय श्री राम' लिहिण्याचा संदेश

या धमकीच्या पत्रातील आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. व्यापाऱ्यांनी पैशांची जमवाजमव केल्यानंतर आपल्या दुकानासमोर 'जय श्री राम' असे लिहावे, म्हणजे पैसे देण्याची तयारी असल्याचा संदेश मिळेल, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

तसेच व्यापाऱ्यांना उद्देशून आक्षेपार्ह भाषा आणि शिवीगाळही करण्यात आली आहे. आठही पत्रांमधील हस्ताक्षर एकाच व्यक्तीचे असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असून, पत्रांमध्ये लॉरेन्स बिष्णोई आणि 'जय श्री राम' असा उल्लेख करण्यात आला आहे.

नागपूर पोलिसांकडून तपास सुरू; व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

या प्रकरणी नागपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, धमकीची पत्रे कोणी पाठवली, त्यामागे नेमके कोण आहे आणि या प्रकरणाचा लॉरेन्स बिष्णोई गँगशी प्रत्यक्ष काही संबंध आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, या घटनेमुळे नागपूरमधील सराफा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ऑल इंडिया ज्वेलरी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनीही या घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

मुंबईतील अभिनेता टायगर श्रॉफच्या गोळीबार प्रकरणानंतर आता नागपुरातील सराफा व्यापाऱ्यांना लक्ष्य करण्यात आल्याने व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. धमकीच्या पत्रांमागील आरोपींचा शोध घेऊन पोलिसांकडून पुढील कारवाई केली जात आहे.

Inline Article Ad 728x90