बनावट आरोग्य शिबिरांचा सायबर फसवणुकीसाठी वापर; ई-सिम रॅकेटमधील दोघे अटकेत

दिल्ली पोलिसांच्या IFSO युनिटने बनावट आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून गावकऱ्यांचे आधार कार्ड आणि बायोमेट्रिक तपशील मिळवून ई-सिम सक्रिय करणाऱ्या सायबर फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात जितेंद्र सिंह आणि ब्रजेश कुमार या दोघांना अटक करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात ३,००० हून अधिक सिम कार्ड सक्रिय केल्याचा संशय असून, २० हून अधिक सायबर फसवणूक प्रकरणांमध्ये सुमारे २.६४ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे. आरोपी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ई-सिम आणि क्यूआर कोडचा पुरवठा करत होते. या रॅकेटचा डिजिटल अरेस्ट फसवणूक आणि सिम-बॉक्स प्रणालीशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे.

E-Sim_Fraud

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या इंटेलिजन्स फ्युजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स (IFSO) युनिटने बनावट आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून गावकऱ्यांची ओळखपत्रांशी संबंधित माहिती गोळा करून ई-सिम सक्रिय करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या ई-सिमचा वापर डिजिटल अरेस्टसारख्या सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांसाठी केला जात असल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात ३,००० हून अधिक सिम कार्ड सक्रिय करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. तसेच, या सिम कार्डचा संबंध सुमारे २.६४ कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीशी संबंधित २० हून अधिक सायबर गुन्ह्यांच्या तक्रारींशी असल्याचे तपासात उघड झाले आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे जितेंद्र सिंह (वय २९) आणि ब्रजेश कुमार (वय २१) अशी आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी विविध माध्यमांतून प्रत्यक्ष सिम कार्ड मिळवत होते. त्यानंतर ई-सिम सक्रिय करून ते ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून इतरांना पुरवत होते.

उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील सदर परिसरातील कोटा गावात २० आणि २१ ऑक्टोबरच्या मध्यरात्री छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. डिजिटल अरेस्ट सायबर फसवणुकीच्या एका प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली.

व्हॉट्सॲपवरून संपर्क साधून कायदेशीर कारवाईची धमकी देण्यात आलेल्या एका व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. संबंधित तक्रारदाराला सुमारे दोन आठवडे डिजिटल अरेस्टच्या नावाखाली भीती दाखवून धमकावण्यात आले. त्यानंतर सहा वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये सहा व्यवहारांद्वारे तब्बल १.६४ कोटी रुपये हस्तांतरित करण्यास त्याला भाग पाडण्यात आले.

तपासादरम्यान मोबाइल क्रमांक आणि उपकरणांशी संबंधित तांत्रिक माहितीचे विश्लेषण केल्यानंतर पोलिसांना मथुरा-वृंदावन परिसरातील संशयित नेटवर्कचा माग काढण्यात यश आले. पुढील तपासात फेसबुक, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामच्या माध्यमातून सक्रिय ई-सिम आणि त्यांचे क्यूआर कोड पुरवणारे नेटवर्क उघड झाले.

पोलिसांच्या तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. गावांमध्ये अनुदानित दरात औषधे देण्याचे आमिष दाखवून बनावट आरोग्य शिबिरे आयोजित केली जात होती. या शिबिरांच्या माध्यमातून गावकऱ्यांकडून आधार कार्ड आणि बायोमेट्रिक माहिती गोळा केली जात होती. नंतर या माहितीचा गैरवापर करून त्यांच्या नावावर सिम कार्ड मिळवण्यात येत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

आरोपी गेल्या सुमारे वर्षभरापासून प्रत्यक्ष सिम कार्ड आणि ई-सिम मिळवणे, ते सक्रिय करणे आणि पुढे विकणे या कामात गुंतले होते. दररोज अंदाजे २० ते ३० ई-सिमची खरेदी-विक्री होत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी सक्रिय ई-सिम प्रत्येकी ८०० ते १,२०० रुपयांना खरेदी करत होते आणि ते सुमारे २,००० रुपयांना विकत होते. या व्यवहारांसाठी अमेरिकन डॉलरच्या मूल्याशी निगडित असलेल्या USDT या क्रिप्टोकरन्सीचा वापर केला जात होता.

तपासात आरोपींचा ऑनलाइन ग्रुपमधील काही व्यक्तींशी, तसेच परदेशातील संपर्कांशी संवाद असल्याचेही समोर आले आहे. या व्यक्तींची ओळख आणि या रॅकेटचे मोठ्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कशी काही संबंध आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.

आरोपींकडून तीन मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत. तपास यंत्रणांना चकवा देण्यासाठी आरोपी वारंवार मोबाइल फोन बदलत होते आणि जुनी उपकरणे नष्ट करत होते, असा पोलिसांना संशय आहे.

या रॅकेटद्वारे पुरवण्यात आलेल्या ई-सिमचा वापर डिजिटल अरेस्टसारख्या सायबर फसवणुकीसाठी तसेच सिम-बॉक्स प्रणाली उभारण्यासाठी करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Inline Article Ad 728x90