शेअर बाजाराच्या आमिषाने मैत्रीचं जाळं; अखेर विवाहितेच्या सुसाईड नोटमधून धक्कादायक खुलासा!
नाशिकच्या अंबड परिसरात ३८ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. शेअर बाजारात कामाचे आमिष दाखवून महिलेच्या मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेत अश्लील व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचाही आरोप मृत महिलेच्या बहिणीने केला असून, सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी संशयित कैलास ऊर्फ बंटी मिस्तरीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
-1.jpg)
शेअर बाजाराच्या आमिषाने मोबाईलचा ॲक्सेस; ब्लॅकमेलिंगला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
नाशिक : शेअर बाजारात काम मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका विवाहितेचा विश्वास संपादन करून तिच्या मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतल्याचा आणि त्यानंतर अश्लील व्हिडिओच्या आधारे तिला ब्लॅकमेल केल्याचा गंभीर प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. अंबड परिसरातील ३८ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली असून, मृत्यूपूर्वी लिहिलेल्या दोन ते तीन पानांच्या चिठ्ठीत तिने आपली व्यथा मांडली आहे. या प्रकरणी संशयित कैलास ऊर्फ बंटी मिस्तरीविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेअर बाजारात कामाचे आमिष दाखवून विश्वास संपादन
फिर्यादीतील माहितीनुसार, फेब्रुवारी २०२६ मध्ये संशयिताने शेअर बाजारात कामाचे आमिष दाखवत महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर मैत्रीचा गैरफायदा घेत तिच्या मोबाईलचा रिमोट ॲक्सेस मिळवल्याचा आरोप आहे.
संशयिताने व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामच्या माध्यमातून महिलेशी वारंवार व्हिडिओ कॉल केले. या कॉलदरम्यान तिला जबरदस्तीने विवस्त्र होण्यास भाग पाडून स्क्रीन रेकॉर्डिंग केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर या व्हिडिओंच्या आधारे महिलेला ब्लॅकमेल करण्यात आल्याचा आरोप आहे.
'पोलिसांत गेलीस तर मुलांना ठार मारीन'; बहिणीचा गंभीर आरोप
महिलेने या प्रकाराबाबत पोलिसांत तक्रार करू नये, यासाठी संशयिताने तिच्या दोन्ही मुलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप मृत महिलेच्या बहिणीने केला आहे.
अश्लील व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी आणि मुलांच्या जीवाला धोका असल्याच्या भीतीमुळे महिला मानसिक तणावाखाली होती. संशयिताने सातत्याने धमक्या देऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप बहिणीने आपल्या फिर्यादीत केला आहे.
'आई गं, मी कसे काय फसले?'; सुसाईड नोटमधून व्यक्त केली व्यथा
आत्महत्येपूर्वी महिलेने दोन ते तीन पानांची चिठ्ठी लिहिल्याची माहिती समोर आली आहे. या चिठ्ठीत तिने आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत भीती आणि मानसिक त्रास व्यक्त केला आहे.
"आई गं, मी कसे काय फसले? मी खूप मोठ्या जाळ्यात अडकली आहे. मी सुद्धा चुकले. मला माफ करा," असे तिने चिठ्ठीत लिहिल्याचे वृत्त आहे.
संशयिताविरोधात गुन्हा दाखल; पोलिसांकडून शोध सुरू
या प्रकरणी मृत महिलेच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी कैलास ऊर्फ बंटी मिस्तरीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी गुन्हे शोध पथकाला सूचना देण्यात आल्या असून, पुढील तपास सुरू आहे.
मोबाईलचा रिमोट ॲक्सेस नेमका कसा मिळवण्यात आला, संबंधित व्हिडिओंचा वापर कशा प्रकारे करण्यात आला आणि महिलेचा किती काळ छळ सुरू होता, या बाबी तपासातून स्पष्ट होणे अपेक्षित आहे.