सत्तरीत जुळलं प्रेम, शेतात सापडला अर्धवट जळालेला मृतदेह; दीड महिन्यानंतर DNA रिपोर्टने उलगडलं रहस्य
पंढरपूर तालुक्यात 70 वर्षीय वृद्धाच्या हत्येच्या प्रकरणाचा दीड महिन्यानंतर उलगडा झाला आहे. शेतात अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाची DNA तपासणीतून ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांत तपासाची चक्रे फिरवत एका वृद्ध महिलेला अटक केली. प्रेमसंबंधातील वादातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून वादाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
-1781007766627_m.webp)
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील एका 70 वर्षीय वृद्धाच्या हत्येच्या प्रकरणाचा दीड महिन्यानंतर उलगडा झाला आहे. एका शेतात अर्धवट जळालेल्या आणि पुरलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्यानंतर या प्रकरणाचे गूढ वाढले होते. अखेर DNA तपासणीत मृतदेहाची ओळख पटली आणि त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवत एका वृद्ध महिलेला अटक केली.
पोलिसांच्या तपासानुसार, मृत अंबादास खांडेकर आणि मंगल होनमाने यांच्यात गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, काही कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून अंबादास खांडेकर यांची हत्या करण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे.
शेतात सापडला अर्धवट जळालेला मृतदेह
ही घटना साधारण 27 जुलैच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. त्यानंतर 2 ऑगस्ट रोजी गावातील काही नागरिकांना एका शेतात अर्धवट जळालेल्या अवस्थेत पुरलेला मृतदेह दिसून आला. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी तपास सुरू करण्यात आला. त्याच काळात गावातील अंबादास खांडेकर हे बेपत्ता असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली.
मुलींच्या DNA नमुन्यांमुळे पटली ओळख
मृतदेहाची ओळख निश्चित करण्यासाठी अंबादास खांडेकर यांच्या दोन्ही मुलींचे DNA नमुने घेण्यात आले. सुमारे दीड महिन्यानंतर आलेल्या अहवालातून मृतदेह अंबादास खांडेकर यांचाच असल्याचे स्पष्ट झाले.
ओळख पटताच पोलिसांनी तपासाला वेग दिला. त्यानंतर अवघ्या बारा तासांत मंगल होनमाने यांना ताब्यात घेत अटक करण्यात आल्याची माहिती आहे.
वादाचे नेमके कारण काय?
प्रेमसंबंधातून झालेल्या किरकोळ वादानंतर हत्या झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र, दोघांमध्ये नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला आणि संपूर्ण घटना कशी घडली, याचा तपास अद्याप सुरू आहे.
या प्रकरणाने पंढरपूर तालुक्यासह परिसरात मोठी चर्चा निर्माण केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.